सद्गुरू शंकरमहाराज मठाला अनेक वर्षापासून अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. ही अतिक्रमणे हटविण्याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. तसेच याबाबत श्री शंकरमहाराज समाधी ट्रस्टने सातत्याने पाठपुरावा केला आहे.
प्रतिबंधकात्मक न्यायालयीन हुकूम असतानाही त्याचा अवमान करून अन्नछत्र समितीने मठाच्या उत्तर दरवाज्यालगत२१ फेब्रुवारी २०१९ रोजीपासून मनपाच्या जागेवर अतिक्रमण करून देणगी व शिधा जमा करण्याकरिता बेकायदेशीररीत्या लोखंडी स्टॉल उभे केले आहेत. तेथेच अन्नदान, प्रसादवाटप असे कार्यक्रम होतात. लोखंडी स्टॉल मंदिराच्या दरवाजापासून दूर करण्याबाबत ट्रस्टने गेली दोन वर्षे सातत्याने पाठपुरावा केला आहे.
अन्नछत्र समितीने लोखंडी स्टॉल (शेड) हटविण्यासाठी केलेल्या मनपाच्या अतिक्रमण कारवाईविरोधात दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर पुणे यांचे न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर न्यायालयाने अतिक्रमण काढण्याचा आदेश दिला आहे.
पुणे मनपाच्या अतिक्रमण विभागाने लोखंडी स्टॉलवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी श्री शंकरमहाराज समाधी ट्रस्टचे अध्यक्ष भगवान खेडेकर, सचिव सुरेंद्र वाईकर व आसपासच्या रहिवासी सोसायट्यांमधील नागरीकांनी केली आहे.
-------------------
अनेकदा पाठपुरावा करूनही मठाच्या प्रवेशव्दारातील अतिक्रमण हटत नव्हती, मात्र न्यायालयाच्या आदेशाचे पालन महापालिका निश्चित करेल, ही अपेक्षा आहे, आणि मठाचे प्रवेशव्दार अतिक्रमण मुक्त होईल.
- सुरेंद्र वाईकर, सचिव, श्री शंकरमहाराज समाधी ट्रस्ट
-----------------------