Independence Day 2022| स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवादिनी शंकर महाराज समाधी मठातही 'हर घर तिरंगा'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 02:27 PM2022-08-15T14:27:47+5:302022-08-15T14:49:54+5:30
'हर घर तिरंगा अभियान' अंतर्गत तिरंगा लावण्याचे आवाहन...
धनकवडी : ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शंकर महाराज मठात महाराजांच्या समाधीवर सजावट करण्यात आली आहे. यंदा स्वातंत्र्यदिनाच्या ७५ व्या अमृत महोत्सवी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'हर घर तिरंगा अभियान' अंतर्गत तिरंगा लावण्याचे आवाहन केले होते. त्याला उचित प्रतिसाद देत श्री सद्गुरु शंकर महाराज समाधी मठात देखील तिरंगा लावण्यात आला होता. स्वातंत्र्य दिनाची सुट्टी आणि राष्ट्रीय सणाची पर्वणी साधत आज भाविकांनी मोठ्या संख्येने शंकर महाराज समाधीचे दर्शन घेतले.
श्री सद्गुरू संतवर्य योगीराज शंकर महाराज मठ हे अतिशय जागृत देवस्थान असून येथे मागितलेल्या सर्व इच्छा पूर्ण होतात अशी तमाम भाविकांची श्रद्धा आहे. पुणे शहरामध्ये धनकवडी परिसरामध्ये श्री सद्गुरू संतवर्य योगीराज शंकर महाराज यांचा समाधी मठ आहे. या मठाला दररोज हजारो भाविक भेट देत असतात.
याठिकाणी श्री सद्गुरू संतवर्य योगीराज शंकर महाराज यांनी १९४७ साली समाधी घेतली होती. या मठाला अनेक भाविक, राजकीय व्यक्ती आणि बॉलिवूड कलाकार भेट देत असतात. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, धीरूभाई अंबानी अशा अनेक सुप्रसिद्ध कर्तृत्ववान व्यक्तींनी आतापर्यंत महाराजांच्या समाधी मठाला भेट देऊन दर्शन घेतले आहे.
नवनाथ संप्रदायाचे श्री सद्गुरू संतवर्य योगीराज शंकर महाराज आहेत. गुरुपरंपरेमधील महत्त्वाचे गुरु म्हणून देखील शंकर महाराज प्रसिद्ध आहेत. संपूर्ण देशभरातून असंख्य भाविक गुरुपौर्णिमेला तसेच अष्टमीला येत असतात. तसेच महाराजांच्या समाधी अमृत महोत्सव निमित्ताने प्रत्येक महिन्याच्या अष्टमीला रक्तदान शिबिराचे आयोजन ट्रस्टतर्फे करण्यात येते.