शंकराचार्य हे एकप्रकारची शक्ती - सुमित्रा महाजन; शंकराचार्य पुरस्कार प्रदान सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 03:29 AM2018-04-21T03:29:02+5:302018-04-21T03:29:02+5:30
जगदगुरू शंकराचार्याने भारतभ्रमण केले आणि त्यांनी अद्वैत तत्त्वज्ञानाची शिकवण दिली. त्यामुळे पाखंडी आणि वामाचारी संप्रदाय भंगले. देशाच्या सीमा सदैव सुरक्षित असाव्यात, या हेतूने शंकराचार्य यांनी गोवर्धन पीठ, श्रृंगेरी पीठ, शारदापीठ आणि ज्योर्तिमठ अशा भारताच्या चार दिशांना चार पीठांची स्थापना केली.
पुणे : जगदगुरू शंकराचार्याने भारतभ्रमण केले आणि त्यांनी अद्वैत तत्त्वज्ञानाची शिकवण दिली. त्यामुळे पाखंडी आणि वामाचारी संप्रदाय भंगले. देशाच्या सीमा सदैव सुरक्षित असाव्यात, या हेतूने शंकराचार्य यांनी गोवर्धन पीठ, श्रृंगेरी पीठ, शारदापीठ आणि ज्योर्तिमठ अशा भारताच्या चार दिशांना चार पीठांची स्थापना केली. जगदगुरू शंकराचार्य आपणास मिळालेले देणे आहे. अशा कार्यक्रमातून आम्हाला एक प्रकारची शक्ती मिळते, असे प्रतिपादन लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी केले.
आद्य शंकराचार्य जयंती महोत्सवानिमित्त श्रुतिसागर आश्रमातर्फे ज्ञानराज माणिकप्रभू महाराज यांना भगवत्पूज्यपाद आदी शंकराचार्य पुरस्कार आणि वेदमूर्ती श्रीधर अडी यांना वेदसंवर्धन पुरस्कार सुमित्रा महाजन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी महापौर मुक्ता टिळक, कुडली श्रृंगेरी मठाचे शंकराचार्य विद्याभिनव शंकरभारती महास्वामी, श्रुतिसागर आश्रमाचे स्वामी स्वरूपानंद सरस्वती, स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती, अखिल भारतीय त्रिपदी परिवाराचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब तराणेकर, शिक्षणतज्ज्ञ डॉ. मो. स. गोसावी, अमरावती विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. एस. टी. देशमुख आदी उपस्थित होते.
महाजन म्हणाल्या, आपल्या देशातील सुराज्य आणि सुशासनाची परंपरा रामायण-महाभारतापासून चालत आलेली आहे. मंगोलिया देशातील लोक बौद्ध धर्म स्वीकारून भारताकडे पाहात आहेत. आपण त्यांना जवळ करावे, असे वाटते. भारतातील दगडसुद्धा व्हिएतनाममध्ये सांभाळून ठेवले जातात. आपणास याबद्दल काहीच माहिती नाही. प्रत्येकाने देश समजावून घेणे गरजेचे आहे.
महापौर टिळक म्हणाल्या, दांभिकतेमुळे समाज भरकटत जात आहे. समाज भरकटू नये, यासाठी श्रुतिसागर आश्रमाकडून कार्य केले जात आहे. माणिकप्रभूमहाराज म्हणाले, हा सन्मान माझा नाही तर गुरू परंपरेचा सन्मान आहे. स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती म्हणाल्या, आज समाजात दांभिकता वाढलेली आहे. धर्माचे अधिष्ठान सगळ्यांना लाभावे, यासाठी सर्व संत आपणास मार्गदर्शक केले आहे. प्रास्ताविक उदय जोशी यांनी केले.