"शरद पवार-अजित पवारांचं राजकारण राष्ट्रासाठी, महाराष्ट्रासाठी शुभ अन् मंगल"
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 10:35 PM2023-08-28T22:35:32+5:302023-08-28T22:46:10+5:30
शिवसेनेत बंड पडून मोठा गट भाजपासोबत सत्तेत सहभागी झाला आणि उद्धव ठाकरेंना पायउतार व्हावे लागलं.
मुंबई/पुणे - राज्यातील राजकारण गेल्या ४ वर्षात सातत्याने नागमोडी वळणं घेताना पाहायला मिळत आहे. राज्यात शरद पवार यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला आणि सर्वाधिक आमदार निवडून आलेला भाजपा पक्ष विरोधात गेला. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येत सरकार स्थापन झाल्याने राज्यातील राजकारणात पहिला मोठा धक्का पाहायला मिळाला होता. त्यानंतर, शिवसेनेत बंड पडून मोठा गट भाजपासोबत सत्तेत सहभागी झाला आणि उद्धव ठाकरेंना पायउतार व्हावे लागलं.
राज्यातील बदलत्या राजकारणाची गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चा आहे. त्यातच, शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही बंड झाले असून अजित पवारांच्या नेतृत्त्वात वेगळा गट सत्तेत सहभागी झाला आहे. म्हणजेच, भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना हे सत्तेत आहेत. त्यासोबतच, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे विरोधातचही आहेत. काँग्रेस एकमेव पक्ष सत्तेत नसून विरोधात आहे. त्यामुळे, हे राजकारण नेमकं काय चाललंय, हे गोंधळून टाकणारं आहे.
योगगुरु रामदेव बाबा हे पुणे दौऱ्यावर आले असता पत्रकारांना त्यांना महाराष्ट्रातील राजकारणाविषयी प्रश्न विचारला. त्यावर, प्रादेशिक राजकारणावर मी जास्त काही बोलू शकत नाही, असे बाबा रामदेव यांनी म्हटलं. मात्र, शरद पवार आणि अजित पवार यांच्या राजकारणाचा त्यांनी उल्लेख केला. त्यांच्या राजकारणाकडे आपण कसं पाहता, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला होता. त्यावर, शरद पवार आणि अजित पवार यांचं राजकारण राष्ट्रासाठी आणि महाराष्ट्राशी शुभ आहे, मंगल आहे, असे म्हणत बाबा रामदेव यांनी काढता पाय घेतला.
दरम्यान, २०२४ मध्ये मोदींशिवाय दुसरा पर्याय नाही, असे म्हणत लोकसभा निवडणुकांवरही त्यांनी भाष्य केले.