पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपाध्यक्ष अमित शहांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. अमित शहा यांच्या वक्तव्यावरुन न्यायालयाचे निर्णयही भाजपाला मान्य नसल्याचे दिसून येते, असे पवार यांनी म्हटले. शबरीमला मंदिर प्रवेशाबाबत सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर केरळ सरकारने महिलांना मंदिरात प्रवेश देण्याची तयारी केली होती. मात्र, सुप्रीम कोर्ट असे निर्णय कसे देते अशी भाषा भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केली. न्यायालयाने दिलेले निर्णयही भाजपला मंजूर नाहीत हेच यावरून दिसते, असे पवार यांनी म्हटले आहे.
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संविधान बचाव यात्रेची समारोप सभा सुरू आहे. या कार्यक्रला जयंत पाटील, अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उपस्थित आहेत. याचा कार्यक्रमाता बोलताना पवार यांनी मोदी सरकार आणि भाजपाच्या हुकूमशाही धोरणावर टीका केली. सीबीआयसारख्या देशातील महत्वाच्या आणि स्वतंत्र यंत्रणांच्या प्रमुखांना एका रात्रीत काढण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या व्यक्तीच्या चौकशी सुरू आहेत, त्यांना प्रमुख म्हणून त्यांच्या जागी नेमण्यात आले आहे. आम्ही जे वागू तेच बरोबर आहे, असे देशावर ठसवण्यात आल्याचे पवार यांनी मोदी सरकारवर टीका करताना म्हटले.
महाराष्ट्रावर दुष्काळाचे संकट, शेकडो भगिनी पाण्यासाठी कष्ट करत आहेत. दुष्काळाची झळ समाजाच्या प्रत्येक घटकाला बसते. मात्र, राज्य सरकार अनुकूल निर्णय घेण्यास तयार नाही. मुख्यमंत्र्यांनी चारा छावण्या करणार नाही असे सांगितले. याच महाराष्ट्रात आम्ही छावण्या करून हजारो जनावरांना जगवले होते. पण, त्यासाठी भाजप सरकारची तयारी नाही, असेही पवार म्हणाले.
आरक्षणावर गदा आणण्याचा सरकारचा प्रयत्नपंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विराट कोहलीच्या शतकावर ट्विट करण्यास वेळ आहे. मात्र, देशात महिलांना खून, बलात्कारासारख्या महिला अत्याचाराला तोंड देतात. तेव्हा त्यावर साधी प्रतिक्रियाही पंतप्रधान देत नाहीत, अशा शब्दांत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टीका केली.