'एमआयएम' सोबत जाण्याच्या चर्चेला शरद पवारांचा पूर्णविराम, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 07:33 PM2022-03-20T19:33:39+5:302022-03-20T19:33:49+5:30
'एमआयएम'ला महाविकास आघाडीत सामील करून घेण्याचे आवाहन आघाडीच्या नेत्यांना केले आहे
बारामती : कुणी कुठल्या पक्षासोबत जायचं हे ते स्वत: सांगू शकतात. परंतु ज्यांच्यासोबत जायचंय त्या पक्षाने तरी होकार दिला पाहिजे. हा राजकीय निर्णय आहे. हा निर्णय महाराष्ट्रापुरता कुणी प्रस्तावित केला असला तरी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष म्हणून अशा प्रकारचा राजकीय निर्णय राज्याला घेण्याचा अधिकार देत नाही. राज्याला या निर्णयाबाबत राष्ट्रीय समितीने स्पष्ट करेपर्यंत कोणत्याही राज्यात अशा प्रकारची भुमिका ते घेऊ शकत नाहीत. त्यामुळं महाराष्ट्रात गेली दोन दिवस जो एमआयएमबाबत ज्या बातम्या येतायत. तो पक्ष निर्णय नाही, अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी 'एमआयएम'सोबत जाण्याची शक्यता नसल्याचे सांगितले.
एमआयएम चे खासदार इम्तियाज जलील यांनी 'एमआयएम'ला महाविकास आघाडीत सामील करून घेण्याचे आवाहन आघाडीच्या नेत्यांना केले आहे .या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या राजकीय चर्चेला पवार यांनी राष्ट्रवादीच्या वतीने पूर्ण विराम दिला आहे. माळेगाव येथील निवासस्थानी रविवारी (दि २०)सायंकाळी पत्रकारांशी पवार बोलत होते.
यावेळी पुरंदर विमानतळाबाबत पवार पुढे म्हणाले ,एक जागा जवळपास निश्चित झालेली आहे .त्याला जवळपास सर्व विभागांनी मान्यता दिली आहे. त्या जागेच्या बाबत संरक्षण खात्याची काही मते आहेत. ती विमानतळाच्या अनुषंगाने दुर्लक्षित करता येत नाहीत. त्यामुळे यासंबंधीचा निर्णय घेण्यात प्रत आलेली यंत्रणा सध्या थांबली आहे. राज्याच्या च्या दृष्टीने पुण्याच्या विमानतळाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा हा आमचा प्रयत्न आहे.
यासाठी संरक्षणमंत्री आणि संबंधित विभागातील यंत्रणांसोबत राज्य सरकारच्या प्रतिनिधींसह बैठक घेऊन निर्णय घ्यावा. हा आग्रह आम्ही दिल्लीत जाऊन करणार आहे. यापूर्वी एकदा झालेल्या बैठकीत मान्यता मिळाली. पण सरंक्षण खात्याने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याला राज्य सरकारकडून या विभागात काम करणाऱ्या यंत्रणेकडून उत्तर दिले जाईल, असे पवार म्हणाले.