पुणे :महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा यंदाचा विजेता हर्षवर्धन सदगीर याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष शरद पवार यांनी तब्बल १२ लाखांचा धनादेश देऊ केला आहे. पावले यांच्या विद्या प्रतिष्ठान, बारामती या ट्रस्टतर्फे ही मदत करण्यात आली.
नुकत्याच पार पडलेल्या या स्पर्धेत हर्षवर्धन याने मानाची चांदीची गदा आणि महाराष्ट्र केसरी किताब आपल्या नावावर केला. त्यावेळी स्पर्धा जिंकल्यावर त्याने प्रतिस्पर्धी आणि त्याच्याच तालमीचा पहिलवान योगेश शेळके याला खांद्यावर घेत खिलाडूवृत्ती दाखवली. मात्र आज त्याचे प्रशिक्षक काका पवार यांनी स्पर्धेत विजेतेपद मिळालेल्या मल्लास अवघे २० हजार रुपये मिळत असल्याचे सांगितले. हर्षवर्धन हा अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील गरीब कुटुंबातून येतो. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी लढून त्याने हे यश मिळवले आहे. अशावेळी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी त्याला आर्थिक पाठबळाची गरज होती. पवार यांनी हेच लक्षात घेत पुढील एक वर्षांसाठी विश्वस्त विठ्ठल मणियार, माजी महापौर अंकुश काकडे यांच्याहस्ते चेक सुपूर्त केला.
या पूर्वीही पवार यांनी आधीचे महाराष्ट्र केसरी अभिजीत कटके, राहुल आवारे, उत्कर्ष काळे, किरण भगत यांनाही मदत केल्याचे मणियार यांनी सांगितले. दरम्यान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्यावेळी पवार यांना लक्ष्य करत समोर कोणी पहिलवान नसल्याची टीका केली होती. त्यावर पवार यांनी मी कुस्तीचं नव्हे तर क्रिकेट, कबड्डीचाही अध्यक्ष असल्याचे सांगितले होते. त्यांचा हा कलगीतुरा बरेच दिवस रंगला होता. आज पवार यांनी गरजू कुस्तीगीराला मदत करत त्यांचे कुस्तीप्रेम दाखवून दिले आहे.