राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी इंदापूर येथून आपल्या झंझावत प्रचाराची सांगता केली. इंदापूर मतदारसंघात हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीका केली आहे. हर्षवर्धन पाटील यांना मी संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. पण, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. शंकरराव भाऊंनी काँग्रेसचा विचार सोडला नाही आणि हे थेट भाजपमध्ये गेले. जो माणूस थांबायला तयार होता, त्याच्यावर कधीही अन्याय झाला नसता, असे म्हणत शरद पवार यांनीच हर्षवर्धन पाटील हे स्वखुशीनेच भाजपात गेल्याचं पवारांनी सांगितलं.
हर्षवर्धन पाटील जाताना म्हणाले की माझ्यावर अन्याय झाला. इंदापूरच्या जागेबाबत माझ्याशी चर्चा केली होती. आपण, यातून मार्ग काढू असे मी त्यांना म्हणालो होतो. मी द्त्तात्रय भरणे यांच्याशीही बोललो होतो. भरणेही थांबतो म्हणाले होते, असे म्हणत हर्षवर्धन पाटलांनाच भाजपात जायचे होते, केवळ कारण म्हणून राष्ट्रवादीला पुढे केल्याचं शरद पवार यांनी इंदापूर येथील सभेतून सांगितले. इंदापूर मतदारसंघातून आघाडीचे तिकीट आपणास देण्यात येणार नसल्याचे सांगून हर्षवर्धन पाटील यांनी भाजपात प्रवेश केला होता. पाटील यांच्या प्रवेशाबाबत आत्तापर्यंत सुप्रिया सुळे आणि अजित पवारांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. आज खुद्द शरद पवारांनीच याबाबत मौन सोडले.
शरद पवार यांनी इंदापूर येथे राष्ट्रवादीचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. त्यावेळी, सरकारवर टीका करताना हर्षवर्धन पाटलांनाही लक्ष्य केलं. तसेच, सत्तेचा वापर हा लोकांच्या भल्यासाठी व्हायला हवा. आम्ही व्याजाचे दर कमी केले. बळीराजाला सन्मानाने जगता यावं यासाठी आम्ही निर्णय घेतले. जे लोक निर्णय घेत नाहीत त्यांच्याच घरात या इंदापूर मधला गडी जाऊन बसला, ज्याचे अवघे घरदार सुरूवातीपासून काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते होते, असे म्हणत पवारांनी हर्षवर्धन पाटलांना लक्ष्य केलं.