Narendra Modi in Pune : 'मेट्रोचं काम पूर्ण झालं नाही तरी उद्घाटन केलं जातंय'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2022 01:29 PM2022-03-05T13:29:54+5:302022-03-05T13:40:29+5:30
'कोरोनासारखं एवढं मोठं संकट देशावर कधी आलं नव्हतं, पण आपलं भाग्य आहे की आपण त्यातून सावरत आहोत...'
पुणे : आज आपल्या भारतातील अनेक मूलं अजूनही युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. अशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi in pune) उद्या पुण्यात येणार आहेत. काही दिवसांपूर्वी मी स्वतः या मार्गावरून मेट्रोतून गेलो होतो. तेव्हा या मार्गाचे काम झाले नसल्याचे लक्षात आले होते. मेट्रोचे काम झाले नाही तरी उद्घाटन केलं जातंय, असं खा. शरद पवार (sharad pawar) पुण्यात बोलताना म्हणाले. पुण्यातील वारजे माळवाडी येथे पुणे महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या कै. सुभद्रा प्रभाकर बराटे मल्टीस्पेशालटी हॉस्पिटलच्या उद्घाटनावेळी पवार बोलत होते.
पुढे बोलताना पवार म्हणाले, कोरोनासारखं एवढं मोठं संकट देशावर कधी आलं नव्हतं, पण आपलं भाग्य आहे की आपण त्यातून सावरत आहोत. आपल्या सरकारला लोकांना या संकटातून बाहेर काढण्यात यश आले आहे. महाराष्ट्र संकटात असताना घरात बसने हा काही माझा स्वभाव नाही. त्यामुळे मी निम्मा महाराष्ट्र या काळात फिरल्याचेही पवार यांनी सांगितले. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या कामाचे कौतुकही यावेळी पवार यांनी केले.
रशिया-युक्रेन (russia ukraine crises) मद्द्यावर बोलताना पवार म्हणाले, सध्या युक्रेन- रशिया युद्ध सुरु आहे. जसा पुण्याचा उल्लेख शिक्षणाचा माहेरघर म्हणून केला जातो तशाच ज्ञानाचा देश म्हणून युक्रेनची ओळख आहे. कमी पैशात तिथे शिक्षण मिळते. ज्या कुटुंबियांची फी भरण्याची ताकद नाही ती तिथे जाऊन शिक्षण घेत आहेत. तिथं अडकलेल्या सर्व मुलांना लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावे, असंही पवार यावेळी म्हणाले.