पुणे : वेदांता व फॉक्सकॉन प्रकल्प गेला तर जाऊ दे, तुम्हाला दुसरा देतो, असे म्हणणे म्हणजे तुम्ही लहान मुलाची समजूत काढतात तशी महाराष्ट्राची समजूत काढता का? अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. देशातील अन्य पक्षीय स्थिर सरकारने अस्थिर करण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे, असा आरोप करत त्यांनी राज्यातच नव्हे तर देशातच खोके संस्कृती आणली जात असल्याची टीका केली.
गेलेला प्रकल्प आता महाराष्ट्रात परत येईल, असे वाटत नाही. महाराष्ट्र गुंतवणुकीच्या बाबतीत देशात नेहमीच पहिल्या क्रमाकांवर होता. आपण मुख्यमंत्री होतो त्यावेळी फक्त गुंतवणुकीसाठी म्हणून रोज २ तास देत होतो. नव्या सरकारने तसे करणे अपेक्षित आहे. गुजरातमध्ये गेलेल्या प्रकल्पाचे खापर ठाकरे सरकारवर फोडणे अयोग्य आहे. आत्ता तसे बोलणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योगमंत्री उदय सामंत हेच ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातही मंत्री होते, याकडे पवार यांनी लक्ष वेधले.
पवार यांनी पुण्यात या विषयासंदर्भाने गुरुवारी दुपारी पत्रकार परिषद घेतली. पवार म्हणाले, नव्या सरकारचे काहीच काम दिसायला तयार नाही. सगळ्या सरकारी यंत्रणा थंड दिसतात, हे काम कधी करतात, करतात की नाही? असा प्रश्न निर्माण होत आहे. देशस्तरावर तर त्यांची सत्ता नसलेल्या राज्यांमधील स्थिर सरकारने अस्थिर करण्याचा, त्यासाठी सरकारी साधनसंपत्तीचा वापर करण्याचा प्रकार सुरू आहे. कर्नाटक, बिहार, मध्य प्रदेश, गोवा सगळीकडे असेच सुरू आहे. खोके संस्कृती राज्यातच नाही तर देशात जोर धरत आहे.
त्वरित लसीकरण सुरू करा...
शेतकरी आत्महत्या करत आहेत. मात्र, त्याकडे सरकारचे लक्ष नाही. तांदूळ निर्यात जगात भारताकडून सर्वाधिक होते. त्याला उत्तेजन द्यायचे सोडून त्या निर्यातीवर २० टक्के कर लावला गेला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या फायद्यावर टाच आली. लम्पीसारख्या जनावरांच्या रोगाची आधीच काळजी घेणे गरजेचे होते. तशी ती घेतली गेली नाही, असे पवार म्हणाले. आता निदान राज्यभरात सर्वत्र त्वरित लसीकरण सुरू केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने ७२ पेक्षा जास्त वय असलेल्यांना खेळाच्या संघटनांवर पदाधिकारी म्हणून राहू नये, असे सांगितले आहे, त्यामुळे खेळाच्या सर्व संस्थांमधून राजीनामा दिला आहे, अशी माहिती पवार यांनी दिली.