शरद पवारांचा ‘नवा उद्योग’ सल्लागाराचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:08 AM2021-06-26T04:08:55+5:302021-06-26T04:08:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “देशात पर्याय उभा राहिलाच पाहिजे. तो काँग्रेसला बरोबर घेऊनच, पण त्याचे नेतृत्व सामुदायिक हवे,” ...

Sharad Pawar's 'New Industry' consultant | शरद पवारांचा ‘नवा उद्योग’ सल्लागाराचा

शरद पवारांचा ‘नवा उद्योग’ सल्लागाराचा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “देशात पर्याय उभा राहिलाच पाहिजे. तो काँग्रेसला बरोबर घेऊनच, पण त्याचे नेतृत्व सामुदायिक हवे,” असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. ‘सामुदायिक नेतृत्व म्हणजे शरद पवार का,’ असा प्रश्न विचारला असता मिस्कीलपणे हसत पवार उत्तरले, “असे बरेच उद्योग आतापर्यंत केले आहेत. माझी भूमिका आता मार्गदर्शकाची, सल्ला, दिशा देण्याची राहील.”

पक्षाच्या पुण्यातील नव्या कार्यालयाची पवारांनी शुक्रवारी (दि. २५) सायंकाळी पाहणी केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

पवार म्हणाले, “दिल्लीत झालेली बैठक पर्याय निर्माण करण्याच्या विचाराने नव्हतीच. तिथे सहा महिन्यांहून अधिक काळ शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यांनी कटाक्षाने राजकीय पक्षांना दूर ठेवले आहे. पण इतके महिने सुरू असलेल्या प्रश्नावर संसदेत विषय कसा मांडता येईल, त्यावर काय करता येईल यासाठी ही बैठकीत चर्चा झाली.”

“केंद्रातील भाजपाला पर्याय नक्कीच निर्माण झाला पाहिजे, पण तो काँग्रेसला वगळून नको अशी माझी भूमिका आहे. ती जाहीरपणे मांडली आहे. मात्र या पर्यायाचे नेतृत्व सामुदायिक हवे,” असे मत पवार यांनी स्पष्ट केले. काश्मीरविषयी पंतप्रधान जे काय म्हणाले ते चांगले आहे, पण काश्मीरला स्वतंत्र दर्जा होता, तो काढून घेऊ नका, असे त्यांना आम्ही वारंवार सांगत होतो. ते त्यांनी ऐकले नाही. आता बहुधा त्यांना त्यांची चूक समजली असेल तर तेही चांगलेच आहे. फक्त आता त्यांनी बदलू नये, असे पवार म्हणाले.

माजी मंत्री अनिल देशमुखांबाबत जे काही होत आहे त्या गोष्टी आम्हाला नव्या नाहीत असे सांगून पवार म्हणाले, “मागे त्यांच्या चिरंजीवांच्या उद्योगावरही केंद्र सरकारने अशीच प्रेमाची नजर टाकली होती. त्यांना काय मिळाले माहिती नाही, पण काहीच मिळाले नाही अशी माझी माहिती आहे. देशाचे राज्यकर्ते विरोधी भूमिका घेणाऱ्यांच्या विरोधात ईडी, सीबीआयचा वापर करत आहेत जे की आजपर्यंत कधी झाले नव्हते.”

Web Title: Sharad Pawar's 'New Industry' consultant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.