शरदराव आम्हाला बाळासाहेबांसमान! बाळा नांदगावकर : पवारांना दुसरा ‘पी’ कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 05:34 AM2017-11-27T05:34:04+5:302017-11-27T05:34:23+5:30
सध्या निष्ठावान कोणाला म्हणावं हे कळण्यास मार्ग राहिला नाही, असे सांगत शरदराव आम्हाला बाळासाहेबांच्या जागी असून, त्यांच्या बद्दल आदर आहे, असे वक्तव्य मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
पुणे : सध्या निष्ठावान कोणाला म्हणावं हे कळण्यास मार्ग राहिला नाही, असे सांगत शरदराव आम्हाला बाळासाहेबांच्या जागी असून, त्यांच्या बद्दल आदर आहे, असे वक्तव्य मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
राजकारणासह समाजकारण, सहकार आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रात आपला ठसा उमटविणारे माजी खासदार अशोक मोहोळ यांच्या अमृत महोत्सवानिमित्त बालेवाडी येथे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना नांदगावकर यांनी चांगलीच फटकेबाजी केली.
शरद पवारांवर स्तुतीसुमने ओवाळत नांदगावकर म्हणाले, शरदराव आम्हाला बाळासाहेबांच्या जागी आहेत. त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. शरदरावांचे बोट धरून अनेकजण राजकारणात आले. अगदी गुजरातहून आले आणि पंतप्रधान झाले. पण पवारसाहेब तुम्हाला एक पी (पद्मविभूषण) मिळाला दुसरा पी (पंतप्रधानपद) कधी मिळणार?
पुढे नांदगावकर म्हणाले, आमच्या पक्षाचं कुठेही सरकार नसल्याने आम्हाला काही कामच उरलं नव्हतं. सध्या फेरीवाल्यांचा मुद्दा हाती लागल्याने भारी काम झालं आहे. राजकारणातही फेरीवाले निर्माण झाले आहेत. सध्या गिरीश बापटांच्या पक्षात फेरीवाल्यांची जोरदार चर्चा आहे, या नांदगावकरांच्या वाक्यावर एकच हशा पिकला.
...अन् पुणेकरांच्या मनातील खंत दूर केली
सदानंद मोहोळ आणि अशोक मोहोळ हे चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळत होते. पुढे चालून त्यांनी देशाचे नेतृत्व देखील केले असते. मात्र काही कारणास्तव त्यांनी मध्येच क्रिकेट थांबवले. याबाबत जिल्ह्यातील लोकांच्या मनात खंत होती. परंतु जगाच्या क्रिकेट संघटनेचे नेतृत्व करून मी पुणेकरांच्या मनात असलेली खंत दूर केली, अशी आठवण शरद पवार यांनी येथे सांगितली.