सातबार्यावर नाव लावण्यासाठी लाच मागणारा शिक्रापूरचा तलाठी जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 09:38 PM2021-06-10T21:38:03+5:302021-06-10T21:38:09+5:30
खासगी व्यक्तीसह दोघांवर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
पुणे: विकत घेतलेल्या जमिनीवरील सातबार्यावर नाव लावण्यासाठी २५ हजारांची लाच मागितल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने शिक्रापूर तलाठ्यासह एका खासगी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.
सजा शिक्रापूर तलाठी अविनाश केवलसिंग जाधव (वय ३२) आणि पंडीत उमाजी जाधव (वय २९) अशी दोघांची नावे आहेत. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
तक्रारदार यांचे पत्नीच्या नावे शिक्रापूर येथे एक गुंठा जागा विकत घेतली आहे. या जागेची नोंद सातबारा उतार्यावर घेण्यासाठी तलाठी अविनाश जाधव याने ३० हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदारांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यावर त्याची ४, ७, २१ जानेवारी आणि ८ फेब्रुवारी रोजी पडताळणी करण्यात आली. त्यावेळी तलाठी जाधव याने तडजोडीअंती २५ हजार रुपयांची मागणी करुन ती रक्कम खासगी व्यक्ती पंडित जाधव याच्याकडे देण्यास सांगितले. जाधव याने तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली. परंतु, प्रत्यक्ष लाच घेण्यात आली नाही. मात्र, लाचेची मागणी करण्यात आली असल्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांवर लाचेच्या मागणीचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली. पोलीस निरीक्षक अलका सरग अधिक तपास करीत आहेत.