पुणे : शिवसेनेतील बंडानंतर पुणे शहरात एकाकी वाटणाऱ्या शिंदे गटाला एकनाथ शिंदे यांची मुख्यंत्रिपदी निवड झाल्यानंतर चांगलाच जाेर आला आहे. महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाबरोबर आमची युती पक्की असून, ती ठाकरे गटाशी होत होती, त्यापेक्षा अधिक सन्मानाने होईल, असा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. त्यातील काहीजणांनी तर प्रभाग निश्चित करून तयारीलाही सुरूवात केली आहे.
शिवसेना एकत्र असतानाही शहरामध्ये शिवसेनेचे फारसे वर्चस्व नव्हते. विसर्जित महापालिकेत शिवसेनेचे ९ नगरसेवक होते. त्यातीलच नाना भानगिरे हे हडपसर परिसरातील माजी नगरसेवक शिंदे गटात जाहीरपणे गेले आहेत. त्यांना शिंदे गटाने शहरप्रमुख म्हणून नियुक्त केले आहे. त्यांनीच शिवसेनेतील आणखी काही नगरसेवक शिंदे गटाबरोबर येणार असल्याचे जाहीर केले. मात्र, तशी काही हालचाल अद्याप हाेताना दिसत नाही.
शिवसेनेचे माजी शहरप्रमुख अजय भोसले यांनीही शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्याकडे संपर्कप्रमुख अशी जबाबदारी देण्यात आली आहे. त्याशिवाय युवासेनेचे प्रदेश सचिव किरण साळी यांनीही शिंदे गट जवळ केला. साळी हे शिंदे गटात जाऊन पुन्हा मंत्रिपद मिळवलेले उदय सामंत यांचे समर्थक आहेत. शिंदे गटातही त्यांच्याकडे युवा सेनेचे महाराष्ट्र सचिव अशीच जबाबदारी आहे.
पुणे महापालिका निवडणूक लढवण्याबाबत शिंदे गटातील हे सगळेच गंभीर आहेत. याबाबत किरण साळी म्हणाले, ‘‘राज्यात आम्ही भाजप बरोबर आहोतच. त्यामुळेच महापालिकेसाठी आमची युती पक्की असेल. आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपच्या वरिष्ठांबरोबर चर्चा करतीलच, पण आम्हीही स्थानिक स्तरावर चांगली तयारी करून आहोत. शिवसेनेच्या जागा आम्ही मागणार आहोतच, त्याशिवाय उपनगरांमधील काही जागांवरही आमचा दावा आहे.’’शहराच्या मध्य भागात वर्चस्व असलेल्या भाजपला उपनगरांमध्येच फटका बसतो. विसर्जित महापालिकेत त्यांचे ९८ नगरसेवक निवडून आले होते. मात्र, त्यातील बहुसंख्य शहराच्या मध्य भागातील आहेत. उपनगरांमध्ये जागा हव्या असतील तर शिंदे गटाच्या साथीने त्या मिळू शकतात, असे भाजपच्या स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या याच म्हणण्याला शिंदे गटाकडून पुष्टी देण्यात येत आहे. साळी यांनी सांगितले की, आम्ही तिथे चांगली कामगिरी करू शकतो, हे स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांच्या नजरेस आणले आहे.
भाजपने मागील महापालिका निवडणुकीत रिपाइंच्या आठवले गटाबरोबर युती केली, त्यांना ५ जागाही दिल्या. मात्र, त्यांच्या उमेदवारांना भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवायला लावली. शिंदे गटाबाबतही त्यांनी अशीच भूमिका घेतली तर काय, यावर बोलताना साळी यांनी या सर्व पुढील गोष्टी आहेत. नेते त्याबाबत निर्णय घेतील. स्थानिक स्तरावर मात्र आम्ही व आमचे कार्यकर्ते भाजपबरोबर युती पक्की असेच धरून चाललो आहाेत. चिन्ह कोणते, जागा किती व कोणत्या याबाबतचा निर्णय वरिष्ठच घेतील.
युतीचा निर्णय भाजपत स्थानिक स्तरावर होत नाही. पक्षश्रेष्ठीच त्याबाबत ठरवतात. सध्या राज्यात ते आमच्याबरोबर आहेतच; पण महापालिकेसाठी बऱ्याच गोष्टी असतात. त्याबाबत पक्षातील वरिष्ठांबरोबर प्राथमिक चर्चा झाली आहे, अंतिम निर्णय त्यांचा असेल व तो आम्हाला मान्य असेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुणे दौऱ्यात भाजप पदाधिकारी नव्हते या टिकेत तथ्य नाही. मी स्वत: बाहेर होतो व अन्य पदाधिकारीही पक्षाच्या पुढील कार्यक्रमांच्या नियोजनात मग्न होते. - जगदीश मुळीक, शहराध्यक्ष, भाजप
शिवसेनेतील अनेक नाराजांबरोबर आमचा संपर्क आहे. आम्ही कोणीही त्यांच्यावर कसलाही दबाव टाकत नाही. मात्र, तेच आपणहून ऐनवेळी निर्णय घेतील, याची खात्री आहे. शिंदे गट म्हणजेच शिवसेना आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी आम्हीच प्रामाणिक आहोत. त्यामुळे सामान्य शिवसैनिकांकडून आम्हालाच पाठिंबा मिळेल, असा विश्वास आहे. महापालिकेची आम्ही तयारी करत आहोत. - किरण साळी, प्रदेश सचिव, युवा सेना (शिंदे गट)
शहराबरोबरच जिल्ह्यातही जोर
शिवसेनेतील फुटीने राज्यातील सत्ता समिकरणे बदलली, तशीच ती आता महापालिकेतही बदलू पाहत आहेत. बंडाच्या सुरूवातीला शिंदे गटाला पुणे शहरातच नव्हे तर जिल्ह्यातही कोणी वाली नव्हता. पुरंदरमधील माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी जाहीरपणे शिंदे गटाची स्तुती केली व ते त्यांच्याबरोबर गेलेही. त्यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनीही तीच वाट धरली. आता खडकवासल्यामधील शिवसेनेचे माजी पदाधिकारी कोंडे यांच्याबरोबरच आणखी काहीजण शिंदे गटात प्रवेश करत आहेत.