लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गेल्या महिन्यापासून कोरोना रुग्णांची आकडेवारी रोखण्यास आरोग्य विभागास यश आलेले असतानाच पुन्हा कोरोना रुग्णांच्या आकड्यात आठवड्यापासून सातत्याने वाढ होत आहे. जिल्ह्यात पुणे-नगर मार्गावरील गावांमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहेत. शिरूर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण वाढत असल्याने तालुका हॉटस्पॉट ठरत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. त्या पाठोपाठ मुळशी आणि हवेली तालुक्यातही हॉटस्पॉट गावांची संख्या वाढायला असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
प्रशासनाने गेल्या वर्षभरात लावलेले लॉकडाऊन, केलेल्या उपाययोजना आणि जनजागृतीमुळे कोरोना बाधितांचा वाढता वेग नियंत्रणात आणला होता. एकेकाळी हजारांच्या आकड्यात सापडणारे रुग्ण मोजक्या प्रमाणात आढळत होते. यामुळे कडक असलेले निर्बंध प्रशासनाने शिथिल केले होते. त्यात कोरोना लसीकरणही जिल्ह्यात सुरू झाल्याने कोरोनाचा प्रसार संपला अशा भ्रमात नागरिक वावरू लागले होते. मास्क न घालने, लग्न सभा समारंभात गर्दी करणे, कोरोना नियमावलीला फासलेला हरताळ या मुळे आटाेक्यात आलेला रुग्णवाढीचा वेग पुन्हा वाढला आहे.
पुणे नगर मार्गावरील गावात कोरोनाने डोके काढले आहे. तालुक्यातील कोरोना हॉटस्पॉट गावे वाढू लागली आहेत. शिक्रापूर, तळेगाव ढमढेरे, टाकळी हाजी, निर्वी, पिंपळे जगताप या गावांत बाधीत वाढू लागले आहे. शिरूर पाठोपाठ मुळशी तालुकाही कोरोना हॉटस्पॉट होत आहेत. मुळशीतील हिंजवडी, मारूंजी, बावधन, म्हाळुंगे येथे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत.
वाढत्या रुग्णामुळे प्रशासनाने पुन्हा निर्बंध कडक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. लग्न, सभा, समारंभातील गर्दीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. ज्या गावात रुग्ण वाढत आहेत अशा गावांची यादी करून हॉटस्पाॅट गावांबरोबर मायक्रो कॅन्टोन्मेंट झाेन तयार करण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार यांनी दिल्या आहेत.
चौकट
हवेलीत पुन्हा बाधितांच्या संख्येत होतेय वाढ
जिल्ह्यात हवेली तालुका सर्वाधिक हॉटस्पॉट तालुका होता. मात्र, प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांमुळे येथील रुग्णवाढीचा वेग प्रशासनाने आटोक्यात आणला होता. मात्र, पुन्हा तालुक्यात कोरोनाने डोके वर काढले आहे. तालुक्यातील वाघोली, नांदेड, उरुळी कांचन, तसे लोणी काळभोर परिसरात रुग्ण वाढू लागल्याने काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
जिल्ह्यातील हॉटस्पॉट गावे आणि रुग्णसंख्या
तालुका गावे रुग्णसंख्या सक्रिय रुग्ण
जुन्नर वारूळवाडी २७५ ११
हवेली वाघोली २७७७ ३५
हवेली नांदेड ९४६ १५
हवेली उरुळी कांचन ८४४ १०
मुळशी हिंजवडी ७२७ १६
मुळशी मारूंजी २२९ १२
मुळशी बावधन २७० १६
मुळशी म्हाळुंगे २६४ १०
शिरूर शिक्रापूर १००२ ४५
शिरूर तळेगाव ढमढेरे३७६ ११
शिरूर निर्वी २६ १६
शिरूर टाकळी हाजी १०८ १४
शिरूर शिरूर ग्रामीण ४३१ २१
शिरूर पिंपळे जगताप ४६ १०---
चौकट
जिल्ह्याचा मृत्यूदर २.३ टक्के
जिल्ह्यातील लसीकरण
आरोग्य कर्मचारी - ६०६६१
फ्रंटलाइन कर्मचारी -६५७९
जिल्ह्यातील दंडात्मक कारवाई
जिल्ह्यात कोरोना नियमावली न पाळणाऱ्यांवर पोलीस तसेच ग्रामपंचायतींनी कारवाई केली आहे. या मोहिमेअंतर्गत २ लाख ३६ हजार ४१४ जणांवर आतापर्यंत कारवाई करण्यात आली आहे. तर त्यांच्याकडून ५ कोटी २७ लाख २६ हजार ८९५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
कोट
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. यामुळे प्रशासन पुन्हा निर्बंध कडक करण्याच्या विचाराधीन आहे. नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून गर्दीच्या ठिकाणी मास्क लावणे तसेच कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
-भगवान पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी