महायुतीचा घटक पक्ष 'शिवसंग्राम' लोकसभेच्या तीन तर विधानसभेच्या बारा जागांसाठी आग्रही

By राजू हिंगे | Published: January 16, 2024 08:09 PM2024-01-16T20:09:25+5:302024-01-16T20:09:50+5:30

भारतीय जनता पक्षाकडून महायुतीमध्ये आम्हाला योग्य तो सन्मान मिळेल. तसेच लोकसभा व विधानसभा निवडणुकीत अपेक्षित जागा मिळतील

Shiv Sangram insists on three seats in the Lok Sabha and twelve seats in the Vidhan Sabha | महायुतीचा घटक पक्ष 'शिवसंग्राम' लोकसभेच्या तीन तर विधानसभेच्या बारा जागांसाठी आग्रही

महायुतीचा घटक पक्ष 'शिवसंग्राम' लोकसभेच्या तीन तर विधानसभेच्या बारा जागांसाठी आग्रही

पुणे : महायुतीचा घटक पक्ष असलेला शिवसंग्राम पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीत तीन, तर विधानसभा निवडणुकीत बारा जागांसाठी आग्रही आहे, अशी माहिती शिवसंग्राम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांनी  दिली. आगामी काळातील निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर आणि संघटन बांधणीसाठी शिवसंग्राम महाराष्ट्र प्रदेश राज्यस्तरीय पदाधिकारी मार्गदर्शन शिबिर पार पडले.  त्यानंतर ते पत्रकाराशी बोलत होते. 

यावेळी शिवसंग्राम पक्षाच्या नेत्या डॉ. ज्योती मेटे, शिवसंग्रामचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत आंब्रे, प्रदेश सचिव शेखर पवार, हिंदुराव जाधव, ज्येष्ठ नेते प्रभाकर कोलंगडे, खजिनदार रामनाथ जगदाळे, पुणे शहराध्यक्ष भरत लगड, कालिंदी गोडांबे, चेतन भालेकर, विनोद शिंदे, लहू ओहोळ, भरत फाटक, सागर फाटक आदी उपस्थित होते.
 
तानाजी शिंदे म्हणाले, "महायुतीमध्ये शिवसंग्राम हा भारतीय जनता पक्षाचा घटक पक्ष आहे. गेल्यावेळी शिवसंग्राम पक्षाने लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. मात्र या वेळेला शिवसंग्रामने लोकसभेच्या तीन जागांवर तयारी सुरू केलेली आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत शिवसंग्राम पक्षाचे गेल्यावेळी दोन आमदार निवडून आले होते. या वेळेला शिवसंग्राम पक्ष विधानसभेच्या बारा जागांसाठी आग्रही आहे. भारतीय जनता पक्षाकडून महायुतीमध्ये आम्हाला योग्य तो सन्मान मिळेल. तसेच लोकसभा व विधानसभा निवडणुकीत अपेक्षित जागा मिळतील, असा विश्वास आहे."

मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले असून त्यांना ओबीसींमधून आरक्षण मिळायला हवे  

"मेटे साहेबांच्या नेतृत्वात मराठा आंदोलन झाले होते. तेव्हा आरक्षणदेखील मिळाले होते. आताही मराठा आरक्षणासाठी शिवसंग्राम पक्षाची तीच भूमिका आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्या मराठा आंदोलनात आम्ही पाठीशी आहोत. छगन भुजबळ यांच्या भूमिकेबाबत त्यांचा पक्ष निर्णय घेईल. पण ज्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले आहे, त्यांना ओबीसींमधून आरक्षण मिळायला हवे. सात वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होऊनही शिवस्मारक अडकलेले आहे.  शिवस्मारक लवकरात लवकर उभारण्यासाठी आमचा पाठपुरावा सुरु असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

डॉ. ज्योती मेटे म्हणाल्या, "शिवसंग्राम संघटना ही आपल्यासारख्या मावळ्यांच्या जीवावर पुढे वाटचाल करणार आहे. शिवसंग्राम संपवण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. परंतु शिवसंग्राम कधीही संपणार नाही.  येणाऱ्या काळात आपल्याला संघर्ष करावा लागेल.

Web Title: Shiv Sangram insists on three seats in the Lok Sabha and twelve seats in the Vidhan Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.