सागर कोल्हेंवर कारवाई करावी यासाठी शिवसेनेचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:19 AM2021-03-13T04:19:47+5:302021-03-13T04:19:47+5:30

मंचर : शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर सोशल मीडियात असभ्य भाषा वापरणारे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे भाऊ ...

Shiv Sena's morcha to take action on Sagar Kolhe | सागर कोल्हेंवर कारवाई करावी यासाठी शिवसेनेचा मोर्चा

सागर कोल्हेंवर कारवाई करावी यासाठी शिवसेनेचा मोर्चा

Next

मंचर : शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर सोशल मीडियात असभ्य भाषा वापरणारे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे भाऊ सागर रामसिंग कोल्हे यांच्यावर पोलिसांनी कडक कारवाई करावी या मागणीसाठी शिवसेनेने आज शहरातून मोर्चा काढला. उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल लंभाते यांना निवेदन देण्यात आले.

सागर कोल्हे यांनी बुधवारी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विषयी फेसबूकवर बदनामीकारक मजकूर टाकला होता. मंचरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे यांनी यासंदर्भात मंचर पोलिसात तक्रार दिल्यानंतर सागर कोल्हे यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी कोल्हे यांच्यावर कडक कारवाई करावी यासाठी शिवसेना आक्रमक झाली आहे. याप्रकरणी आंबेगाव तालुका शिवसेनेच्या वतीने आढळराव पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून पोलीस ठाण्यापर्यंत मोर्चा काढण्यात आला. कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणा दिल्या.

उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लंभाते व पोलिस निरीक्षक सुधाकर कोरे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बोलताना पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले म्हणाले, झालेला प्रकार गंभीर आहे. पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम पाळून आंदोलन केले आहे. योग्य ती कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला.

याप्रसंगी संपर्कप्रमुख सुरेश भोर, जिल्हा परिषदेतील गटनेते देविदास दरेकर, उपजिल्हाप्रमुख सुनील बाणखेले, रवींद्र करंजखेले, युवासेना उपजिल्हाप्रमुख कल्पेश बाणखेले, श्री भैरवनाथ पतसंस्थेचे संचालक सागर काजळे, योगेश बाणखेले, सरपंच किरण राजगुरू, सतीश बाणखेले, मालती थोरात, शिवाजी राजगुरू, मंचर शहरप्रमुख संदीप जुन्नरे, सुरेश घुले व शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी लंभाते यांच्याशी चर्चा करून यासंदर्भात कडक कारवाईची मागणी केली.

माजी आमदार शरद सोनवणे, संभाजी तांबे यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी लंभाते यांची भेट घेऊन कडक कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे. लांडेवाडी येथेही या घटनेचा निषेध करण्यात आला आहे.

१२ मंचर शिवसेना

मंचर शहरात शिवसेनेने काढलेला मोर्चा.

Web Title: Shiv Sena's morcha to take action on Sagar Kolhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.