पिंपरी : पिंपळे सौदागर या उच्चभ्रू परिसरात ‘शिवडे आय एम सॉरी...’ अशी फलकबाजी करून प्रियसीची माफी मागणारा महाभाग पोलिसांनी सापडला आहे. याबाबत फलक अधिकृत की अनधिकृत हे तपासण्यासाठी पोलिसांनी महापालिकेला पत्र दिले आहे. त्यामुळे प्रियकर आणि त्याच्या साथीदारांवर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.
पिंपळे सौदागर, वाकड परिसरात उच्चभ्रू वसाहतींची संख्या अधिक आहे. संगणक अभियंते या परिसरात मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. शिवार गार्डन येथील बीआरटी मार्गाच्या लगत असलेल्या विजेच्या खांबांवर ‘शिवडे आय एम सॉरी’ असा मजकूर असलेले फलक लावले असल्याने शहरात खळबळ उडाली होती. शुक्रवारी पहाटे या परिसरात दहा ते पंधरा मोठे आणि की आॅक्स आकारातील सुमारे तीनशेहून अधिक फलक लावले होते. सुरुवातीला हे फलक कोणी लावले याची माहिती मिळत नव्हती. सोशल मीडियावरून याचा बोभाटा झाल्याने पोलीस यंत्रणा जागी झाली आणि त्यांनी शोध घेतला. सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यानंतर सुरुवातीला ही एका लघुपटाची जाहिरात आहे, असे सांगितले. त्यानंतर जागा मालकांशी पोलिसांनी संपर्क साधला़ त्या वेळी हे फलक कोणी लावले हे समजले़ त्यानंतर पोलिसांनी सायंकाळी आदित्य विकास शिंदे (वय २५, रा. केशवनगर चिंचवड) व त्याचा मित्र नीलेश संजय खेडेकर (वय २५, रा. घोरपडी पेठ, पुणे) यांना ताब्यात घेतले. चौकशी केली त्या वेळी प्रियसीकडे माफी मागण्यासाठी हा प्रकार केल्याची कबुली दिली. मात्र, अनधिकृत फलकबाबत कारवाई किंवा तक्रार दाखल करण्याची जबाबदारी महापालिकेची असल्याने पोलिसांनी महापालिकेला कळविले आहे.दरम्यान याबाबत महापालिकेच्या आकाशचिन्ह परवाना विभागास संपर्क साधला असता कारवाई करू, असे आश्वासन दिले होते. मात्र, शनिवारी दिवसभर सहायक आयुक्त विजय खोराटे यांना वारंवार दूरध्वनी केला असता त्यांनी फोन उचलला नाही.
राजकीय वरदहस्ताने कारवाई नाहीच
प्रेयसीशी भांडण झाल्याने तिची माफी मागण्यासाठी एका तरुणाने सुमारे तीनशे फलक ठिकठिकाणी उभारले. कल्पतरू चौक ते पिंपळे सौदागर या परिसरात होर्डिंगवर व रस्त्यावरील विद्युत खांबांवर हे फलक उभारले होते. एका तरुणाची त्याच्या प्रेयसीशी भांडण झाल्याने तिची माफी मागण्यासाठी फलक उभारले आहेत. दरम्यान यातील तरुण हे राजकीय नेत्यांचे नातेवाईक आहेत, त्यामुळे पोलीस आणि महापालिका प्रशासन प्रेमवीरांना पाठीशी घालत असल्याची चर्चा आहे.