लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शहरभर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून विविध उपक्रमांद्वारे शिवजयंतीचा आनंद पुणेकरांनी साजरा केला.
रमणबाग शाळेत इतिहास अभ्यासक मोहन शेटे यांनी शिवचरित्रातील विविध गोष्टी सांगितल्या. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची सिंहगड भेट, उंबरखिंडीची लढाई, गनिमी कावा युद्धतंत्र, छत्रसाल प्रसंग अशा गोष्टी विद्यार्थ्यांनी सांगून शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी केली. प्रशालेतील रंगकर्मी शिक्षक रवींद्र सातपुते यांच्या दिग्दर्शनाखाली ‘जाणता राजा’ या महानाट्यातील निवडक प्रसंगाचे सादरीकरण केले. बाल शिवाजी, गोंधळ, बाबाजी पाटील, कान्होजी जेधे, अफजलखान प्रसंग, शिवराज्याभिषेक सोहळा अशा विविध प्रसंगांची सुरेख गुंफण या नाट्याविष्कारात केली होती. प्रशालेतील सुमारे ५० विद्यार्थी नाटकात सहभागी झाले होते. प्रमुख अतिथी म्हणून बीएमसीसीचे उपप्राचार्य डॉ. आशिष पुराणिक, प्रशालेचे मुख्याध्यापक दिलीप रावडे, उपमुख्याध्यापिका अर्चना पंच, पर्यवेक्षक सुरेश वरगंटीवार आणि सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या भित्तिचित्राचे अनावरण
नारायण पेठ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त रोहित पवार यांच्या हस्ते महाराजांच्या भित्तिचित्राचे अनावरण केले. राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते अंकुश काकडे, बाळासाहेब दाभेकर, निरंजन दाभेकर, चित्रकार नीलेश खराडे, दीपक मानकर, दत्ता सागरे, विशाल धनवडे, अनिल येनपुरे उपस्थित होते. हे चित्र चित्रकार निलेश खराडे यांनी पुणे महापालिकेच्या नारायण पेठेतील साने वाहनतळाच्या भिंतीवर ५५ फूट उंच व २२ फूट रुंद असे रेखाटले आहे. याप्रसंगी रोहित पवार म्हणाले की, छत्रपती शिवरायांचा आदर्श या चित्रातून सर्वांना प्रेरणा देत राहील.