‘शिवशाही’ जोमात अन् ‘लालपरी’ भिजते पावसात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:14 AM2021-08-22T04:14:07+5:302021-08-22T04:14:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शिवशाही, विठाईसारख्या गाड्या तुलनेने नव्या असल्याने या गाड्यांमधला प्रवास चांगला होत असला तरीही सामान्य ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शिवशाही, विठाईसारख्या गाड्या तुलनेने नव्या असल्याने या गाड्यांमधला प्रवास चांगला होत असला तरीही सामान्य प्रवाशांची सोबती ‘लालपरी’तल्या प्रवाशांना मात्र पावसात भिजण्याची वेळ येत आहे. छतातून पाऊस गळण्याचे प्रमाण मोठे असल्याने राज्य परिवहन मंडळाच्या (एसटी) ‘लालपरी’तून भिजत प्रवास करावा लागतो.
एसटी प्रत्येक डेपोला अशा नादुरुस्त गाड्यांची तत्काळ दुरुस्ती करावी मगच त्यांना प्रवाशांच्या सेवेत आणावी, असा आदेश दिला. याचा काही अंशी परिणाम झाला खरा मात्र आजही लालपरी पावसात गळत असल्याचा प्रवाशांचा अनुभव आहे. एसटीची प्रवासी सेवा आता पूर्वपदावर आली आहे. गाड्या पूर्ण क्षमतेने धावत आहे. कोरोनामुळे काही गाड्या बंद अवस्थेत होत्या. या गाड्या आतून-बाहेरून चांगल्या अवस्थेत दिसत असल्या तरीही तरीही अनेक गाड्यांच्या छतांना छिद्रे पडली आहे. त्यामुळे मोठा पाऊस झाला तर प्रवाशांना भिजत प्रवास करावा लागतो.
लांब पल्ल्याच्या मार्गावर चांगल्या स्थितीतल्या गाड्या धावत आहेत. मात्र जवळच्या अंतरासाठी धावणाऱ्या तसेच विशेषतः ग्रामीण भागात धावणाऱ्या गाड्यांच्या बाबतीत ही समस्या प्रामुख्याने भेडसावते आहे. काही गाड्यांची आसनेदेखील फाटली आहेत. अशा परिस्थितीत प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे.
चौकट
गाड्यांचा ‘मेंटेनन्स’ वाढला, उत्पन्न नाही
कोरोनाच्या काळात बंद झालेल्या गाड्या आजही अनेक आगारात थांबून आहेत. गाड्यांची इंजिने बिघडू नयेत म्हणून या गाड्या आगारातच फिरवल्या जात आहेत. असे असले तरी गाड्यांच्या देखभालीवर मोठा खर्च होत आहे. वर्षाला सुमारे अडीचशे कोटी रुपये देखभालीवरच खर्च होतात. त्या तुलनेत या गाड्यांच्या प्रवासी वाहतुकीतून उत्पन्न मिळत नसल्याने एसटीचा तोटा दिवसेंदिवस वाढतो आहे.
चौकट
प्रवाशांच्या प्रतिक्रिया
“शिवशाही, शिवनेरीसारख्या महत्त्वाच्या गाड्यांची स्थिती चांगली असते. मात्र ‘लालपरी’कडे प्रशासनाचे दुर्लक्ष होते. त्यामुळे सामान्य प्रवाशांना पावसाळ्यात प्रवास करणे अडचणीचे होते. एसटी प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे.”-
सचिन पाटील, प्रवासी
चौकट
“एसटीने प्रवासी सुविधा देताना गाड्यांची स्थिती, त्याची अंतर्गत स्वच्छता याकडे देखील लक्ष दिले पाहिजे. अनेक गाड्यांच्या खिडक्यांची तावदाने तुटलेली असतात. त्यामुळे गाडीत खडखडाट होतो. त्याचा त्रास वर्षभरच असतो. पावसाळ्यात छत गळण्यामुळे त्रासात वाढ होते.”
नागेश कोळेकर, प्रवासी
चौकट
“गाडीचे छत गळू नये यासाठी आम्ही योग्य ती खबरदारी घेतो. याबाबत प्रवाशाच्या काही तक्रारी असतील तर त्यांनी एसटी प्रशासनाच्या निदर्शनास आणाव्यात. अद्याप याबाबत कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही.”
- ज्ञानेश्वर रणवरे, विभागीय वाहतूक अधिकारी, पुणे विभाग, एसटी महामंडळ