पुणे : महापालिकेने प्रस्तावित केलेली शिवसृष्टीसाठीची खास सभा मंगळवारी पुन्हा एकदा तहकूब करण्यात आली. वारंवार असेच करत असल्यामुळे या विषयाचा पाठपुरावा करणाºया नगरसेवक दीपक मानकर यांनी मेट्रोचे काम बंद तसेच उपोषण करण्याचा इशारा दिला. महापौर मुक्ता टिळक यांनी याबाबत मुख्यमंत्र्यासमवेत लवकरच बैठक आयोजित करू असे सांगितले.कोथरूड येथील महापालिकेच्या भूखंडावर शिवसृष्टी प्रस्तावित करण्यात आली आहे. नेमका तोच भूखंड मेट्रोसाठी निवडण्यात आला. त्यामुळे शिवसृष्टीसमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. ते निघावे व या प्रकल्पाला गती मिळावी, यासाठी मानकर प्रयत्न करत आहेत. प्रस्तावित जागेवरच शिवसृष्टी व्हावी, असा त्यांचा आग्रह आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांनी तीन महिन्यांपूर्वी यासंदर्भात मुंबईत मेट्रोचे अधिकारी तसेच महापालिका पदाधिकारी, अधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित केली होती.त्या बैठकीत दोन्ही प्रकल्प एकाच जागेवर होतील का याची तपासणी करण्याचे ठरले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर अशीच संयुक्त बैठक घेण्याचा निर्णय झाला, मात्र त्याला तीन महिने झाले, त्यावर मुख्यमंत्री पुण्यात चार वेळा येऊन गेले तरीही ही बैठक झालेली नाही. त्याचा संताप मानकर यांनी सभागृहात हा विषय चर्चेला आल्यानंतर व्यक्त केला. छत्रपतींचे नाव घेऊन सत्तेवर आला त्याची आठवण तरी ठेवा, हा विलंब शिवप्रेमी जनता आता सहन करणार नाही. येत्या ११ फेब्रुवारीपर्यंत बैठक झाली नाही तर त्याच दिवशी मेट्रोचे काम बंद पाडण्यात येईल, तसेच पौड रस्त्यावर शिवप्रेमी कार्यकर्ते उपोषणास बसतील, असा इशारा त्यांनी दिला.याच विषयावर नगरसेवक अॅड. गफूर पठाण, श्रीमती सुंडके, विशाल धनवडे, पृथ्वीराज सुतार, संजय भोसले आदींनी भाषणे केली. या विषयावर त्वरीत निर्णय घ्यावा, आम्ही मानकर यांच्याबरोबर राहू, त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा असेल, असे सर्वांनी सांगितले.९ फेब्रुवारीला सभा होणारमहापौर मुक्ता टिळक यांनी यावर काहीही ठोस आश्वासन दिले नाही, मात्र या संदर्भात आपण मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबर चर्चा करत आहोत. ते बुधवारी पुण्यात आहेत, त्यामुळे झाली तर उद्याच अन्यथा पुढील आठवड्यात बैठकीचे नियोजन करू, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर सभा तहकूब करण्यात आली. आता ही सभा ९ फेब्रुवारीला ठेवण्यात आली आहे.
शिवसृष्टी पुन्हा अधांतरीच, मानकर यांचा मेट्रो काम बंदचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 3:38 AM