कचऱ्यांपासून वीजनिर्मितीचा महापालिकेला ‘शॉक’
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 03:34 PM2020-01-03T15:34:04+5:302020-01-03T15:41:02+5:30
ओला कचरा जिरवून त्यापासून वीजनिर्मितीसाठी पालिकेने शहराच्या विविध भागांमध्ये २५ प्रकल्प उभारले.
पुणे : ओला कचरा जिरवून त्यापासून वीजनिर्मितीसाठी पालिकेने शहराच्या विविध भागांमध्ये २५ प्रकल्प उभारले. या प्रकल्पांत सव्वाशे टन ओल्या कचºयाची विल्हेवाट लावण्याचा उद्देश होता; परंतु, तब्बल १६ कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या प्रकल्पांच्या देखभालीवर आतापर्यंत अडीच कोटींचा खर्च झाला आहे. पण, येथे प्रत्यक्षात वीजनिर्मितीच होत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महापालिकेला १८ कोटी ५० लाखांचा ‘शॉक’ बसला आहे.
हडपसर, पेशवे पार्क, कात्रज रेल्वे संग्रहालय, घोले रस्ता, वानवडी, वडगाव, मॉडेल कॉलनी, धनकवडी-के. के. मार्केट, वडगावशेरी आदी ठिकाणी हे प्रकल्प उभारले आहेत. यातील हडपसर असलेल्या दोन प्रकल्पांसह पेशवे पार्कमधील प्रकल्प पूर्णपणे बंद होते. त्यामुळे या ठिकाणी एक टनसुद्धा कचरा पाठवला गेला नाही. त्यामुळे या ठिकाणी वीज व गॅस निर्मितीच झाली नाही. हे प्रकल्प आॅक्टोबर २०१५पासून बंद आहेत. यासोबतच कात्रजच्या रेल्वे संग्रहालयातील प्रकल्पसुद्धा आॅक्टोबर २०१५ ते जुलै २०१९ या काळात बंद होता. या ठिकाणची वीजनिर्मितीची संकल्पना प्रत्यक्षात उतरूच शकली नाही. कात्रज रेल्वे संग्रहालय, घोले रस्ता आणि वानवडी या ठिकाणी अद्याप एकही युनिट वीजनिर्मिती झालेली नाही. प्रत्येक प्रकल्पामध्ये महिन्याला १५० टन कचरा जिरविणे अपेक्षित असताना वडगाव येथील एक व दोन क्रमांकाचे प्रकल्प, घोले रस्ता, मॉडेल कॉलनी व के. के. मार्केट येथील ५ प्रकल्पांमध्ये ५० टक्के एवढ्याच क्षमतेने कचरा जिरवला गेला आहे. कात्रजचे ३ व ४ क्रमांकांचे प्रकल्पही तीन महिन्यांपासून बंद पडलेले आहेत. तर, वडगावशेरी येथील दोन क्रमांकाचा प्रकल्पही दोन निविदा प्रक्रिया न झाल्याने बंद आहे.
.........
फक्त ५० टक्के क्षमतेने बायोगॅसची निर्मिती
४प्रकल्पांमध्ये दहा किलो ओल्या कचºयापासून एक घनमीटर बायोगॅसची निर्मिती होणे आवश्यक आहे. परंतु, या कालावधीमध्ये या २० प्रकल्पांमध्ये पाठविलेल्या कचºयापासून फक्त ५० टक्के क्षमतेने बायोगॅसची निर्मिती झाली आहे. एक घनमीटर बायोगॅसपासून १.२० युनिट वीज निर्माण होते.
४त्यानुसार पाच टनांच्या २० प्रकल्पांमध्ये मिळून महिन्याकाठी ३ लाख ६० हजार युनिट वीजनिर्मिती होणे अपेक्षित आहे. या निर्मितीमधून पालिकेचे दरमहा २३ लाखांचे आणि वर्षाकाठी पावणेतीन कोटींचे वीजबिल वाचले असते. परंतु, प्रत्यक्षात २० टक्केच वीजनिर्मिती झाल्याने ही बचतही होऊ शकली नाही.
............
ओल्या कचºयापासून वीजनिर्मिती प्रकल्पांच्या दुरवस्थेबाबत आम्ही चार वर्षांपासून आयुक्तांना सांगत आहोत. ही दुरवस्था वारंवार त्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. परंतु, त्यावर कोणतीही कार्यवाही केलेली नाही. एकंदरीत, हा करदात्या पुणेकरांच्या पैशांचा अपव्यय आहे. आम्ही माहिती अधिकारामध्ये मिळवलेल्या माहितीवरुन ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. - विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच.