पुणे : लॉकडाऊनमुळे अनेक जण बेरोजगार झाले. घरात खाण्यास काहीही नसल्याने अनेकांना उपाशी राहण्याची पाळी आली. त्यात नवी पेठेतील राजेंद्रनगरमधील एका घरात एकट्याने राहणारा गृहस्थ तब्बल ८ ते १० दिवस उपाशी राहिल्याने प्रचंड अशक्त झाला. इतके की त्याला चालत येऊन दरवाजा उघडणे मुश्कील झाले होते. शेजारच्यांमुळे ही गोष्ट समोर आली असून सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना मदत केली आहे.
राजेंद्रनगरमधील मनपा वसाहतीतील एका इमारतीमधील पहिल्या मजल्यावर हे सुमारे ५० वर्षांचे गृहस्थ राहतात. गेले काही दिवसापासून बेरोजगार होते. त्यात लॉकडाऊन सुरु झाल्यामुळे ते घरातून बाहेर पडत नव्हते. गेले चार ते पाच दिवस त्यांनी घराचा दरवाजाही उघडला नव्हता. त्यामुळे शेजारी राहणार्यांना भीती वाटू लागली. त्यांनी सोमवारी दुपारी पोलीस नियंत्रण कक्षाला ही बाब सांगितली. त्यानंतर सेनादत्त पोलीस चौकीचे भरत कळमकर, अमाले फणसे हे मार्शल तेथे गेले. त्यांनी तसेच सोसायटीमधील अनेकांनी बाहेरुन दरवाजा ठोठावला. परंतु, आतून काहीही उत्तर मिळत नव्हते. त्यानंतर पोलिसांनीअग्निशमन दलाला बोलावले. त्यानंतर यशवंत भोसले व इतरांनी पुन्हा दरवाजा वाजविला. तेव्हा आतून दरवाजा उघडला गेला. सुमारे ५० वर्षाची ही व्यक्ती इतकी अशक्त झाली होती की, त्यांना उठून उभे राहता येत नव्हते. पोलिसांनी त्यांना पाणी पिण्यास देऊन काही मदत हवी का अशी विचारणा केली. त्यात ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याची शक्यता व्यक्त केली गेल्याने त्यांना मदत करतानाही सर्वांवर मर्यादा आल्या. पोलिसांनी १०८ नंबरला कॉल करुन रुग्णवाहिका मागविली. परंतु रात्री उशिरापर्यंत रुग्णवाहिका आली नाही.
सामाजिक कार्यकर्ते यशवंत भोसले यांनी सांगितले की, रात्री उशिरा रग्णवाहिका आली. त्यातून आम्ही त्यांना ससून रुग्णालयात नेले. परंतु, तेथे दाखल करुन घेण्यात आले नाही. त्यासाठी १० हजार रुपये मागण्यात आले. त्यानंतर त्यांना नायडु हॉस्पिटलला नेण्यात आले. तेथे त्यांची कोविड चाचणी केली, ती निगेटिव्ह आली. परंतु, तेथेही काही उपचार करण्यात आले नाही. शेवटी पहाटे ३ वाजता त्यांना पुन्हा घरी आणण्यात आले.
याबाबत राहुल मानकर यांनी सांगितले की, येथील कार्यकर्त्यांना ससून रुग्णालयाचा वाईट अनुभव आला. इतकी अशक्त व्यक्तीला त्यांनी दाखल करुन घेतले पाहिजे होते. आम्ही आता येथील एका डॉक्टरांकडे त्यांच्यावर उपचार करणार आहोत.
ही माहिती डॉ. मिलिंद भोई यांना 'लोकमत' वार्ताहराने सांगितल्यावर त्यांनी राजेंद्रनगरला जाऊन त्यांची तपासणी केली. त्यानंतर त्यांना ताराचंद हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेऊन उपचार सुरू केले. आणखी काही तास त्यांच्यावर उपचार झाले नसते तर त्याच्या जीवावर बेतण्याची शक्यता होती, असे डॉ मिलिंद भोई यांनी सांगितले.
राजेंद्रनगरसारख्या मध्य वस्तीत एखादी व्यक्ती बेरोजगारी, लॉकडाऊनमुळे अनेक दिवस उपाशी राहते.इतके दिवस त्यांच्याकडे कोणाचे लक्ष जात नाही़ हा धक्कादायक प्रकार समोर आला.