उरुळी कांचन : भिशीत गुंतवणुकीच्या नावाखाली उरुळी कांचन (ता. हवेली) येथील एका बड्या व्यापाऱ्याने उरुळी कांचन,लोणी काळभोर, हडपसरसह पुर्व हवेलीमधील सुमारे पाचशेहुन अधिक "बड्या" आसामींकडून दोनशे कोटीहुन अधिकची माया जमा करुन आपल्या कुटुंबिंयासह उरुळी कांचन येथुन पोबारा केल्याने अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले असल्याची घटना पूर्व हवेलीत घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
उरुळी कांचन व परिसरात अशा प्रकारे भिशी चालवणाऱ्या व अनधिकृतपणे व्याजाच्या पैश्याचा व्यवहार करणाऱ्या मंडळींना त्यांच्या नावापुढे "शेठ" लावून मान देण्याची प्रथा सर्रास चालू आहे. असाच एक भिशी चालक व्यापारी कुटुंबिंयासह महिन्याभरापासुन फरार झाल्याने "घी गया अन बडघा भी गया" अवस्था गुंतवणुकदारांची झाली आहे. फसविल्या गेलेल्या पाचशेपैकी काही गुंतवणुकदारांशी या व्यापाऱ्याचा फोनवरुन संपर्क होत असला तरी महिन्याभऱापूर्वी त्याने पोबारा केला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी या व्यापाऱ्याच्या विरोधात उरुळी कांचन गावातील काही गुंतवणुकदारांनी लोणी काळभोरपोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भिशीची हप्ते भरणे अनेक जण टाळत असल्याने, भिशीच्या लिलावानंतर पैसे मिळण्यास शेठकडून विलंब वाढताच गुंतवणूकदारांनी त्याला जेरीस आणण्यास सुरवात करताच या व्यापाऱ्याने कुटुंबाला घेऊन उरुळी कांचनमधील राहत्या घरातून धूम ठोकली. मात्र, पंधरा दिवसांपूर्वी त्याच्या पत्नीला कोरोना झाल्याने एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. तेथून त्याने पत्नी व मुलांना घेऊन पळ काढला.
पैसे थकलेल्यापैकी एका बड्या गुंतवणुकदाराने सांगितले, उरुळी कांचन, लोणी काळभोरसह पूर्व हवेलीमधील अनेक मातब्बर गुंतवणुकदारांनी पन्नास लाखांपासुन ते दहा कोटी रुपयांपर्यंतच्या भिशीत गुंतवणुक केलेली आहे. पूर्व हवेली व दौंड तालुक्यातील पाचशेहुन अधिक गुंतवणुकदारांना अडीचशे कोटींच्या आसपास गंडा घातला असण्याची शक्यता आहे. याबाबत उरुळी कांचन पोलिस चौकीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पवन चौधरी म्हणाले, भिशीत गुंतवणुकीच्या नावाखाली उरुळी कांचन (ता. हवेली) येथील एका नामांकित व्यापाऱ्याने लोणी काळभोर, उरुळी कांचन, हडपसरसह पुर्व हवेलीमधील अनेकांना गंडा घातल्याची माहिती आहे. निश्चित रक्कम व फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची संख्या याविषयी आत्ताच काही सांगता येणार नाही.