शाळेच्या आवारातच मद्यप्राशन अन् मांसाहारी जेवणाची पार्टी; खेड तालुक्यातील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 07:51 PM2021-05-22T19:51:39+5:302021-05-22T19:54:28+5:30
जिल्हा परिषद शाळेच्या आवारात दिवसाढवळ्या तळीरामांचा हैदोस....
राजगुरूनगर : टाकळकरवाडी (ता. खेड ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आवारात तळीरामांनी हैदास घातला होता.शाळा आवारात मद्यप्राशन करत मांसाहारी जेवणाची पार्टी केल्याचे प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत ग्रामस्थांनी तक्रारी केल्या होत्या. याबाबत खेडपोलिसांनी ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली असल्याची माहिती खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश गुरव यांनी दिली.
अनुप टाकळकर, निखिल येवले, राजेश पवार, मयुर टाकळकर हे सर्व रा.टाकळकरवाडी (ता खेड ) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकांची नावे आहे.
शाळा म्हणजे समाजाची प्रतिकृती, शाळा म्हणजे संस्कार केंद्र, शाळा म्हणजे देशाचे उज्वल भवितव्य घडवणारी वास्तू अशा या पवित्र ज्ञानमंदिर आवारात या युवकांनी हैदोस घातला होता. टाकळकरवाडी येथील एक नामवंत शाळा म्हणून येथील जिल्हा परिषद शाळेकडे मोठ्या अभिमानाने पाहिले जात आहे. या शाळेला १०० वर्ष पूर्ण होत असुन याच शाळेने गावातील अनेक हुशार विद्यार्थी घडविले आहेत.
कोरोनाचा काळ व सध्या उन्हाळी सुट्टी असल्यामुळे शाळा बंद आहेत. जिल्हा परिषद शाळा आवारात दिवसाढवळ्या लॉकडाऊनचा दुरुपयोग करीत या परिसरातील या मद्य शौकिनांनी दारूचा अड्डा बनविला होता. रोज भरदुपारी व रात्र झाल्यानंतर यथेच्छ दारू ढोसली जात असल्याचे वास्तव दिसत होते. तसेच मांसाहाराची पार्टी करण्यात येते. अन्न शिजविण्यासाठी या शाळा आवारात विटाची चूल या युवकांनी तयार केली होती. या ठिकाणी पडलेल्या रिकाम्या दारूच्या बॉटल्स, प्लॅस्टिक ग्लास ,विविध खाद्यपदार्थाचे रिकामी पाकीट अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या.
गेल्या महिन्यापासून हा प्रकार सुरू होता. अतिशय निंदनीय, लज्जास्पद व भयानक वास्तव समोर असताना या गंभीर प्रकाराकडे ना ग्रामपंचायत, ना शालेय समिती, ना मुख्याध्यापक कडून याची दखल घेतली गेली. हम भी चुप, तुम भी चुप अशा प्रकारच्या अवस्था समोर होती.काही ग्रामस्थांनी वेळोवेळी या तरुणांना समज दिली होती.मात्र तरुण कोणाचेही ऐकत नव्हते.