धक्कादायक! लॉकडाऊनच्या काळात उच्च मध्यमवर्गीयांमध्ये सर्वाधिक व्यसनाधिनता
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2020 03:14 PM2020-12-07T15:14:49+5:302020-12-07T15:15:28+5:30
लॉकडाऊनचा समाजावर झालेला परिणाम तपासण्यासाठी पोलिसांकडून प्रोजेक्ट आरसा राबविला होता. त्यात धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहे.
पुणे : लॉकडाऊनच्या काळात ३१ ते ५० या वयोगटातील लोक व्यसनाधिनतेकडे जास्त झुकताना दिसले. त्याचबरोबर १० लाखांपेक्षा जास्त उत्पन्न् असलेले लोक जास्त व्यसनांच्या आहारी जाताना दिसत आहेत. लॉकडाऊनचा समाजावर झालेला परिणाम तपासण्यासाठी पोलिसांकडून प्रोजेक्ट आरसा राबविला होता. त्यात हे धक्कादायक निष्कर्ष समोर आले. पुणे शहराचे तत्कालीन पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम, विशेष शाखेचे उपायुक्त मितेश घट्टे, पोलीस संशाेधन केंद्र प्रमुख अनंत भोईटे यांच्या पुढाकाराने मन:सृष्टी संस्थेने हा प्रकल्प केला. गेल्या २ महिन्यात आरसा हा संशोधन उपक्रम राबविला. या उपक्रमात पुण्यातील ३ हजारांहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. त्यात सिने अभिनेते, डॉक्टर, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्यांपासून रिक्षाचालक, रोजंदारीवरील कामगार, प्रशासकीय अधिकारी यांचा सहभाग होता.
या संशोधनाच्या निष्कर्षामध्ये असे जाणवले की, ३१ ते ५० आणि ज्येष्ठ नागरिक यांना लॉकडाऊनमधील परिस्थितीशी जुळवून घेणे जास्त कठीण गेले. ज्येष्ठ नागरिकांना एकटेपणा वाढला. महिलांवर कामाचा ताण वाढला. रोजंदारीवर काम करणारा वर्ग निराश व व्यसनाधीनतेकडे झुकताना दिसला. गुन्हेगारी प्रवृत्तीकडे कल सर्वात जास्त याच वर्गात दिसून आला. त्यामुळे या वर्गासाठी लवकरात लवकर रोजगार निर्मिती करणे गरजेचे आहे. मजुरांच्या खालोखाल विद्यार्थी वर्ग सुद्धा गुन्हेगारी प्रवत्तीकडे कल दाखवत आहे. त्यामुळे विद्यार्थी चांगल्या गोष्टीत रमतील, असे उपक्रम शासन व समाजाने सुरु करणे गरजेचे आहे.
नैराश्य वाढल्यामुळे व्यसनाधीनता वाढू शकते आणि व्यसनाधीनता वाढल्यामुळे गुन्हेगारी वाढू शकते. या तीनही गोष्टींचा एकमेकांशी जवळचा संबंध आहे, असे हे संशोधन सांगते.
लाॅकडाऊनच्या काळात अनेक जण नवीन गोष्टी शिकले. त्यामध्ये स्वयंपाक, कला, वाचन, लिखाण, भाषा, वेगवेगळ्या प्रकाराचे ऑनलाईन कोर्सेस अशा अनेक गोष्टी आहेत. स्वत:च्या आरोग्यासाठी व्यायाम, योग, ध्यान या गोष्टी करणे का महत्वाचे आहे हे मोठ्या प्रमाणात लोकांच्या लक्षात आले. मित्र, नातेवाईक यांच्याशी नव्याने झालेला संपर्क अनेकांसाठी सुखावणारा ठरला आहे. काही कुटुंबातील नाती खूप चांगली सुद्धा झाली आहेत.
या प्रकल्पात पोलिसांच्या सहकार्याने मन:सृष्टी या शारीरीक व मानसिक आरोग्य विषयक सामाजिक काम करणाऱ्या संस्थेच्या ३० स्वयंसेवकांनी एक महिन्याहून अधिक काळ काम केले. यापुढील काळात लॉकडाऊन सारखा उपाय करावा लागला तर कोणत्या गोष्टी लक्षात घेऊन नियोजन करणे गरजेचे आहे. या उत्तम अंदाज समाज व प्रशासकीय यंत्रणांना देणारे हे संशोधन आहे.