येरवडा : कामावरून काढून टाकल्याचा राग डोक्यात घेऊन कामगाराने मालकिणीला पेट्रोल ओतून जाळून टाकल्याचा धक्कादायक प्रकार वडगावशेरी येथे घडला. या घटनेत मालकिणीसह कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. बाला जॉनी (वय 32) व मिलिंद नाथसागर (वय 35, दोघेही रा. रामचंद्र सभागृह वडगावशेरी) या दोघांचा या घटनेत मृत्यू झाला आहे.
बाला जॉनी यांचे वडगावशेरी येथील रामचंद्र सभागृह येथे ए टू झेड टेलरिंगचे दुकान आहे. मिलिंद हा बाला हिच्या दुकानात मागील दोन वर्षांपासून काम करत होता. मागील आठवड्यात त्याला बाला यांनी कामावरून काढून टाकले होते. त्याचा राग डोक्यात ठेवून मिलिंद याने बाला हिच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिले. या घटनेत बाला व मिलिंद दोघेही गंभीर जखमी झाले होते. स्थानिक नागरिकांनी तातडीने त्या दोघांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी अवस्थेत उपचारादरम्यान मिलिंद याचा पहाटे पाच वाजता तर बाला हिचा सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास दुर्दैवाने मृत्यू झाला. बाला ही मूळची ओरिसाची असून मागील दहा वर्षांपासून वडगावशेरी येथे टेलरिंगचा व्यवसाय करते. तिचा घटस्फोट झाला असून ती तिच्या दहा वर्षांच्या मुलासह या ठिकाणी राहत होती. मिलिंद हा मूळचा परभणीचा असून मागील दोन वर्षापासून वडगाव शेरी येथे बाला हिच्या दुकानात काम करीत होता.
सोमवारी रात्री कामावरून काढल्याच्या रागातून ही गंभीर घटना घडली. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी मयत आरोपी मिलिंद नाथसागर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत वाचवायला गेलेला प्रशांत कुमार नावाचा तरुणही भाजल्याने जखमी झाला आहे. त्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनास्थळी सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव, गुन्हे निरीक्षक सुनील थोपटे, महिला उपनिरीक्षक स्वप्नाली गायकवाड यांनी भेट दिली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विवेक शिसाळ करीत आहेत.