पुणे : 'बाय बाय डिप्रेशन, सॉरी गुड्डू, सॉरी डुग्गु' अशी आपल्या मुलाला आणि पत्नीला फेसबुक पोस्ट टाकत पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयातील प्राध्यापकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सासवड परिसरातील भिवरी गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. प्रफुल्ल दादाजी मेश्राम (वय ४५, रा. कात्रज) असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे.
कमिन्स महाविद्यालयात प्रफुल्ल मेश्राम हे शिक्षक पदावर काम करत होते. मंगळवारी (दि.१३) दुपारी ही घटना घडल्याचे समोर आले आहे. भिवरी गावातील रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत उडी मारत त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. आत्महत्येच्या अगोदर मेश्राम यांनी फेसबुकवर ‘बाय बाय डिप्रेशन सॉरी गुड्डी’ या आशयाची पोस्ट लिहिली आहे.मागील काही दिवसांपासून ते मानसिक तणावाखाली होते.आणि याच नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे. याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे.
पुरंदर तालुक्यातील भिवरी गावानजीक पुणे सासवड मार्गालागत असणाऱ्या शेतीमधील विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. मयत प्राध्यापकाची फेसबुक पोस्ट बरोबरच लोकेशन ही शेअर केलेले होते. त्यानुसार त्यांचे मित्र याभागात त्याचा शोध घेत होते. तसेच त्यांनी सासवड पोलिसांनी देखील ही माहिती दिली. त्यानुसार ते शोध घेत असताना त्यांच्या विहिरीजवळ चप्पल, गाडीची चावी, पॉकेट, मोबाईल, हेडफोन, रुमाल हे काढून ठेवल्याचे दिसून आले. त्यांनी विहिरीत शोध घेतला असता त्यांना मेश्राम यांचा मृतदेह आढळून आला.
प्रफुल्ल यांनी आत्महत्या केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान त्यांना काही वर्षांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यांना औषध सुरू होते. त्यातच ते नैराश्यात देखील होते असे सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी सांगितले आहे. याबाबत अधिक चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.