पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या मराठी विषयाच्या परीक्षेचा बहुपर्यायी प्रश्नांचा प्रश्नसंच परीक्षेपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे मराठी विषयाच्या परीक्षेचे काम वाढले असून परीक्षेपूर्वीच विद्यार्थ्यांना प्रश्नसंच देणाऱ्या संबंधित प्राध्यापकांवर विद्यापीठातर्फे कारवाई केली जाणार आहे. तसेच सोशल मीडियावर व्हायरल झालेले प्रश्न परीक्षेत विचारले जाणार नाहीत ;याची खबरदारी घेण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाच्या अध्यक्षांकडून अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्न तयार करण्याची जबाबदारी काही प्राध्यापकांना देण्यात आली. त्यात पुणे शहरातील नामांकित महाविद्यालयातील आणि बारामती परिसरातील महाविद्यालयातील दोन महिला प्राध्यापकांनी विद्यापीठाच्या परीक्षेसाठी तयार केलेले प्रश्न विद्यार्थ्यांना पाठविले. परीक्षेपूर्वीच प्रश्न विद्यार्थ्यांना मिळाल्याने एकाच गोंधळ उडाला. परिणामी विद्यापीठाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिरीष लांडगे यांना दिले. त्यावर संबंधित प्रश्न वगळून इतर नवीन प्रश्न काढण्याचे काम अभ्यास मंडळाने सुरू केले आहे. त्यामुळे मराठी विषयाच्या परीक्षेचे काम वाढले आहे.मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य संदीप सांगळे म्हणाले, बहुपर्यायी प्रश्नांच्या आधारे परीक्षा घेण्याची विद्यापीठाची प्रश्न काढण्याची प्राध्यापकांची ही पहिलीच वेळ आहे. परीक्षेचे कामकाज गोपनीय पद्धतीने करणे गरजेचे आहे.मात्र,काही प्राध्यापकांकडून अनावधानाने प्रश्न बाहेर गेले आहेत.-------------मराठी विषयाचे प्रश्न सोशल मीडियावर फिरत असल्याने या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना मराठी अभ्यास मंडळाच्या अध्यक्षांना देण्यात आल्या आहेत. तसेच इतर बहुपर्यायी प्रश्न काढून विद्यापीठाकडे जमा करण्याबाबत त्यांना कळविले आहे.- डॉ. महेश काकडे, संचालक , परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ--------------------सोशल मीडियावर फिरत असलेले प्रश्न वगळून इतर प्रश्न काढण्याचे काम सध्या सुरू आहे. परीक्षेत व्हायरल झालेले प्रश्न येणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे. - डॉ. शिरीष लांडगे अध्यक्ष ,मराठी अभ्यास मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
खळबळजनक! अंतिम वर्षाच्या मराठी विषयाचा प्रश्नसंच सोशल मीडियावर व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2020 8:26 PM
परीक्षेपूर्वीच विद्यार्थ्यांना मराठी विषयाच्या प्रश्नसंच देणाऱ्या संबंधित प्राध्यापकांवर विद्यापीठातर्फे कारवाई केली जाणार आहे..
ठळक मुद्देपरीक्षेचे काम वाढले ; संबंधित प्राध्यापकांवर कारवाई