क्षयरोगाबाबत जनजागृती करणारी ससून रूग्णालयाची शॉर्ट फिल्म ‘खो खो’
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 12:00 AM2019-03-24T00:00:00+5:302019-03-24T00:00:04+5:30
खोकला आणि थुंकीद्वारे क्षयरोग बाधित रूग्ण दुस-याला खो च देत असतो आणि यातूनच हा आजार पसरत जातो.
- नम्रता फडणीस-
पुणे : खो खो हा खेळ आठवून पाहा. एक व्यक्ती पळत असते आणि ती अचानक दुस-याला खो देते आणि मग खो मिळालेली व्यक्ती पळायला सुरूवात करते. हा खेळ असाच चालत राहातो. क्षयरोगासारख्या आजारामध्येही हे पाहायला मिळते. खोकला आणि थुंकीद्वारे क्षयरोग बाधित रूग्ण दुस-याला खो च देत असतो आणि यातूनच हा आजार पसरत जातो. हा खो खोचा खेळ थांबवा अशा आवाहनाद्वारे समाजात जनजागृती करणारा खो खो नावाचा अर्ध्या तासाचा लघुपट ससून रूग्णालयाच्या क्षयरोग विभागाने निर्मित केला आहे. विशेष म्हणजे, या लघुपटातील कलाकार आहेत विभागातलेच कर्मचारी आणि डॉक्टरमंडळी.
शासनाने राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम हाती घेतला असला तरी समाजात या गंभीर आजाराबाबत अद्यापही म्हणावी तेवढी जनजागृती झालेली नाही. याबाबत ससून रूग्णालयाच्या क्षयरोग विभागाने पुढाकार घेऊन या लघुपटाची निर्मिती केली आहे. जगभरातील विविध महोत्सवांमध्ये या लघुपटाचे कौतुक झाले आहे. नाट्यरूपांतरातून या गंभीर आजाराकडे जनमानसाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कुटुंबातील सूनेला सातत्याने ताप आणि खोकला येत असतो. मात्र ती नाटक करत आहे असे तिच्या कुटुंबाला वाटते. तेव्हा शेजारची बाई कुटुंबाला मांत्रिकाकडे जाण्याचा सल्ला देते. मात्र, मांत्रिकाकडून काही घडत नाही. मग डॉक्टरांकडे नेले जाते आणि ती बरी होते. अशा मांडणीतून समाजाचे प्रबोधन करण्यात आले असल्याची माहिती ससून रूग्णालयाचे क्षयरोग विभाग प्रमुख डॉ. संजय गायकवाड यांनी दिली. सोमवार दि. २५ मार्च रोजी बी जे मेडिकल कॉलेजच्या सभागृहात या लघुपटाचे सादरीकरण होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
----------------------------------------------------------------------------------------------
या लघुपटातून थुंकी आणि खोकल्याद्वारे दुस-याला खो देत आजार पसरविण्याचा खेळ थांबवा असा संदेश देण्यात आला आहे. लवकरच या लघुपटाचे शाळा, महाविद्यालयांसह इतर ठिकाणी सादरीकरण केले जाणार आहे- डॉ. संजय गायकवाड, विभागप्रमुख, क्षयरोग ससून रूग्णालय
----------------------------------------------------------------------------------------