सांगवी : पिंपरी-चिंचवड सराफ असोसिएशनच्या वतीने सोमवारपासून २५, २६ व २७ असा तीन दिवस बंद पाळण्यात येणार आहे. अबकारी कर कायद्यातील जाचक अटींवर अद्याप तोडगा न निघाल्याने देशातील सराफांनी सोमवार, दि. २५पासून पुन्हा तीन दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड सराफ असोसिएशनचे अध्यक्ष रमेश सोनिगरा यांनी दिली. संघटनेने दिलेल्या प्रस्तावातील काही मुद्द्यांवर अद्याप चर्चा झालेली नसून, बुधवारपर्यंत त्यावर चर्चा करण्यात येईल. मात्र, त्यातून तोडगा निघाला नाही, तर पुढेही बंद सुरू ठेवण्याबाबतचा निर्णय त्याच दिवशी घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले. देशभरातील सराफांनी अबकारी कराविरोधात एक मार्चपासून दीड महिना बंद केला होता. मागील दहा दिवस केंद्र सरकार व सराफांच्या प्रतिनिधींमध्ये झालेल्या चर्चेमध्ये साधारण ७० टक्के मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली आहे. यातील काही मुद्द्यांवर अद्याप चर्चा झालेली नसून, ती बुधवार, दि. २७ पर्यंत होणे अपेक्षित आहे. (वार्ताहर)
सराफांचा उद्यापासून बंद
By admin | Published: April 24, 2016 4:26 AM