पुणे: वनाज ते आयडियल कॉलनी या ८०० मीटरच्या मार्गावर गुरूवारी रात्री ११ वाजता मेट्रोची तांत्रिक चाचणी घेण्यात आली. ही चाचणी प्रकल्पातंर्गत होती. तांत्रिक काम करणाऱ्या अभियंत्यांनीच ती घेतली. त्यामुळे मेट्रोच्याही कोणा वरिष्ठांना वगैरे त्यासाठी बोलावण्यात आलेले नव्हते, तसेच चाचणी घेणार आहोत असेही जाहीर करण्यात आले नव्हते. असे मेट्रोचे जनसंपर्क विभागाचे संचालक हेमंत सोनवणे यांनी सांगितले.
दरम्यान या परिसरातील नागरिकांनी मात्र रात्री अचानक मेट्रो मार्गावर मेट्रो अवतरल्याचा आनंद घेतला. काहींनी लगेच त्याचा व्हिडीओ व्हायरल केला. अतीशय कमी वेगात चालणारी ही मेट्रो रस्त्यावर थांबून अनेकांनी पाहिली. पाऊस नव्हता आणि काही कामे व्यवस्थित झाली आहेत किंवा नाही हे पाहण्यासाठी म्हणून. ही चाचणी घेतल्याचे मेट्रो अधिकाऱ्यांनी सांगितले. ३ कोच लावून ही चाचणी झाली. मेट्रोचे दिवे लावण्यात आले होते. रात्रीच्या अंधारात रस्त्यावरील खांबांवरून चालणारी मेट्रो मनोहारी दिसत होती असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
https://twitter.com/MiLOKMAT/status/1413374753016999938?ref_src=twsrc%5Etfw
वनाज ते गरवारे महाविद्यालया हा साधारण ५ किलोमीटरचा मेट्रो मार्ग प्राधान्य मार्ग म्हणून महामेट्रोने जाहीर केला आहे. त्यावरील आयडीयल कॉलनी व गरवारे महाविद्यालय या स्थानकांचे बांधकाम जवळपास पुर्ण झाले आहे. एस एनडीटी महाविद्यालय व अन्य दोन. स्थानकांचे कामही गतीने करण्यात येत आहे. मेट्रो मार्ग तर पुर्ण झाला आहे. पिंपरी चिंचवड ते दापोडी या दुसर्या प्राधान्यमार्गाचे काम पुर्ण झाले आहे. १६ ऑगस्ट २०२१ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा मार्ग लोकार्पण करण्याचा महामेट्रोचा प्रयत्न आहे. त्याचवेळी या वनाज ते गरवारे मार्गाची चाचणी व्हावी यासाठी महामेट्रोची धडपड सुरू आहे.