खचून न जाता त्यांनी घेतला चहाचा अाधार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 07:31 PM2018-08-22T19:31:14+5:302018-08-22T19:32:38+5:30
प्राध्यापकाची नाेकरी गेल्यानंतर खचून न जाता पुण्यातील महेश तनपुरे यांनी सिंहगड रस्त्यावर चहाचे दुकान सुरु केले अाहे.
पुणे : तब्बल सतरा महिन्यांचा पगार मिळाला नाही. त्यात नाेकरीही गेली. अायुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर माेठे संकट काेसळले. परंतु या संकटाला न घाबरता त्याला ताेंड देत पुण्यातील प्राध्यापकाने थेट चहाचे दुकान थाटले. सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट मध्ये प्राध्यापक म्हणून महेश तनपुरे हे काम करत हाेते. सिंहगडने प्राध्यापकांचे वेतन थकवल्याने सर्व प्राध्यापकांनी संप केला हाेता. अाता हे प्रकरण न्यायप्रविष्ट अाहे. त्यात सिंहगडने तिनशेहून अधिक प्राध्यापकांना सेवेवरुन कमी केले अाहे. त्यामुळे या प्राध्यपकांना इतरत्र काम शाेधण्याची वेळ अाली अाहे. तरपुरेंनी यातून मार्ग काढत स्वतःचा व्यवसाय सुरु केला अाहे.
तरपुरे हे सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विषयाचे प्राध्यापक हाेते. 14 जून राेजी त्यांना कामावरुन कमी करण्यात अाले. काम सुटल्यामुळे भविष्याचा प्रश्न त्यांच्यासमाेर उभा ठाकला हाेता. त्यातच 17 महिन्यांच्या पगार न मिळाल्याने जवळ फारशी पुंजी सुद्धा नव्हती. अचानक अालेल्या या संकटाला तनपुरे यांनी न घाबरता ताेंड दिले. स्वताकडील पैसे तसेच मित्रांकडून पैसे उसने घेऊन त्यांनी सिंहगड राेडवर चहाचे दुकान सुरु केले. त्यासाठी त्यांनी महिनाभर या व्यवसायाचा अभ्यास केला. चहाची गुणवत्ता चांगली राखण्यासाठी त्यांना त्यांच्या इंजिनिअरींगचा उपयाेग झाला. कप कसे असावेत, दुकानाची रचना यासाठी त्यांनी त्यांच्या इंजिनिअरींगच्या अनुभवाचा उपयाेग केला. 15 अाॅगस्ट राेजी त्यांनी त्यांचे जस्ट टी हे दुकान सुरु केले. या दुकानात 9 प्रकारचे विविध चहा मिळतात. तसेच पित्त हाेणार नाही यासाठी त्यांनी एक खास चहाची रेसिपी शाेधून काढली अाहे. त्याचबराेबर ब्लॅक टी, लेमन टी, चाॅकलेट टी, ग्रीन टी असे विविध प्रकरचे चहा त्यांच्या या दुकानात मिळतात. त्यांच्या या दुकानाला ग्राहकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत अाहे.
तनपुरे म्हणाले, नाेकरी गेल्यानंतर कमी पैशात सुरु करण्यासारखा व्यवासाय हा चहाचा हाेता. त्यामुळे चहाचा व्यवसाय करायचे ठरवले. त्यातही ग्राहकांना चांगल्या प्रतीचा चहा देण्याकडे कटाक्षाने लक्ष दिले. हा चहाचा व्यवसाय सुरु करुन केवळ अाठवडा झाला असला तरी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत अाहे. सध्या दिवसाला राेज 30 ते 40 लिटर दुध चहासाठी लागत अाहे. अचानक अालेल्या संकटामुळे मला व्यवासायाकडे वळावे लागले. हा व्यवसाय सुरु केल्याचा मला नक्कीच अभिमान अाहे.