सर, अपहरण झाले तर काय करावे?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 07:00 AM2019-11-14T07:00:00+5:302019-11-14T07:00:09+5:30
मुलांच्या प्रश्नाने पोलीस आयुक्तही अवाक!
पुणे : पोलीस आयुक्त डॉ़. के़ व्यंकटेशम, सह आयुक्त रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे हे मुलांच्या प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरे देत होती़. त्याचवेळी एक मुलगा उभा राहिला आणि त्याने विचारले सर, अपहरण झाले तर मुलाने काय केले पाहिजे?अचानक आलेल्या या थेट प्रश्नाने पोलीस अधिकारीही क्षणभर अवाक झाले़.
मुलाचा हा प्रश्न अगदी योग्य आणि सर्वांनाच त्याविषयी माहिती असणे आवश्यक असल्याचे जाणून सह आयुक्त शिसवे यांनी सांगितले की, प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळे प्रसंग येत असतात़. त्यावेळी सर्व प्रथम तुम्ही शांत राहण्याचा प्रयत्न करावा़. तुमचे अपहरण करणारे तुमच्यापेक्षा अधिक ताकदवान असतील़. तेव्हा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा़. अपहरणकर्ते काय बोलतात, कोणाशी बोलतात, याचे निरीक्षण करा़. त्याचवेळी या संकटातून तुम्ही निभावून जाऊ, असा विश्वास मनात बाळगा़. तुमचे अपहरण हे घरातून, रस्त्यावरुन केले जाण्याची शक्यता आहे़. त्यावेळी आजूबाजूला कोणी आहे का, हे पहा़ तुमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहचू शकत असेल याची खात्री असेल .तर सर्वप्रथम आरडाओरडा करा़, असा कठीण प्रसंग तुम्ही पार केला तर तुम्ही हिरो व्हा़, सहआयुक्त शिसवे यांनी ज्या सहजपणे अशा प्रसंगात कसे वागावे, हे सांगितल्यानंतर मुलांनी एकच टाळ्यांचा गजर करत त्यांना प्रतिसाद दिला़.
निमित्त होते, बालदिनानिमित्त पुणे शहरातील विविध शाळांमधील मुलांनी बुधवारी पोलीस आयुक्तालयाला भेट देण्याचे़ पोलीस आयुक्तांना भेटण्यासाठी व त्यांना प्रश्न विचारण्यासाठी मुले तयारी करुन आल्याचे दिसून येत होते़. मुलांनी अगदी कोरेगाव भीमामध्ये झालेल्या दंगलीपासून थेट आयोध्या प्रकरणाचा निकालाला लागलेल्या उशीराबद्दल विविध प्रश्न विचारले़.
प्रारंभी सर्व मुलांना भरोसा सेलचे कामकाज कसे चालते, याची माहिती पोलीस निरीक्षक विजया कारंडे यांनी दिली़. सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांनी बाल कल्याणासाठी पोलीस कसे काम करते़. कोल्हटकर क्लासेसचे संग्राम कोल्हटकर यांनी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने मुलांनी आतापासून विचार करण्यास सुरुवात करा़. पदवीपर्यंंत शिक्षण घेताना त्या दिशेने प्रयत्न करा असे सांगितले़.
सायबर क्राईमच्या सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील यांनी सायबर क्राईम, मोबाईलवरील गेमचे दुष्परिणाम तसेच खासगी माहिती सोशल मिडियावर टाकल्यास त्याचा चोरटे कसे गैरफायदा घेऊ शकतात, याचे उदाहरणासह माहिती दिली़.
वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांनी वाहनांमधून प्रवास करताना काय काळजी घ्यावी, याची माहिती दिली़.तसेच अपघात झाल्यास जखमीला तातडीने मदत करावी़ ज्या बस, वाहनात तुम्ही बसता, त्याचा चालक वाहतूकीचे नियम पाळत आहे का याकडे लक्ष द्या़ तो ते पाळत नसेल तर त्याला सावध करा, असे आवाहन मुलांना केले़.
त्यानंतर पोलिसांकडील पिस्तुल, एलएमजी, एके ४७, गन, टियर गॅस गन अशा विविध शस्त्रे व त्याचा उपयोग कसा केला जातो, याची माहिती घेतली़.