पुणे : रविवारी सकाळपासून पुणे शहर व उपनगरात पावसाच्या हलक्या सरी काेसळल्या, त्यामुळे चातकासारखी पावसाची वाट पाहणाऱ्या पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला. सकाळी अचानक सुरु झालेल्या पावसामुळे काहींची मात्र चांगलीच तारांबळ उडाली.
जूनच्या सुरुवातीला जाेरदार पाऊस झाल्यानंतर पावसाने पुण्याकडे पाठ फिरवली हाेती. गेले अनेक दिवस शहरात ढगाळ वातावरण असले तरी पाऊस पडत नव्हता. रविवारी पुण्यातील विश्रांतवाडी, धानाेरी, येरवडा या उपनगरात पावसाच्या सरी काेसळल्या. त्यामुळे पावसाची वाट पाहणाऱ्या नागरिकांना काही काळ दिलासा मिळाला. रविवारमुळे कार्यालयांना सुटी असल्याने रस्त्यावर तुरळक वाहतूक हाेती. पावसांच्या सरींमुळे रस्ते निसरडे झाल्यामुळे वाहन चालक जपूनच अापली वाहने चालवत हाेते. बालचमूंनी या हलक्या सरींमध्ये भिजण्याचा अानंद लुटला. तासभर पडलेल्या पावसाच्या सरींमुळे काहीठिकाणी पाणी साचले हाेते.
दरम्यान वाळवंटी प्रदेशातून येणाऱ्या शुष्क हवेच्या दाबामुळे माॅन्सूनची वाटचाल राेखली गेली अाहे. हिंदी महासागरातही अनुकूल वातावरण नसल्याने पुढील अाठवडाही काेरडा जाण्याची शक्यता अाहे. 22 जून नंतरच्या अाठवड्यात पावसाला सुरुवात हाेण्याची शक्यता असून, ताेही साधारण राहणार अाहे. त्याचा परिणाम पेरण्यांवर हाेण्याची शक्यता अाहे.