इंदापूर तालुक्याची सुत्रे चुकीच्या माणसाच्या हातात गेली- हर्षवर्धन पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2021 04:00 PM2021-11-27T16:00:21+5:302021-11-27T16:02:39+5:30
मग आम्ही सुद्धा कारखान्याच्यावतीने सहकार्य करू....: हर्षवर्धन पाटील
बारामती:इंदापूर तालुक्याचा १९५२ पासून ते २०१४ पर्यंतचा इतिहास काढून पाहिला तर राज्याचे नेतृत्व करण्याची क्षमता इंदापूर तालुक्यामध्ये होती. मात्र दुदैर्वाने चुकीच्या माणसाच्या हातामध्ये इंदापूर तालुक्याची सूत्र गेल्यामुळे आज आपली अवस्था अशी झाली आहे, अशा शब्दात माजीमंत्री हर्षवर्धन पाटील (harshvardhan patil) यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर हल्लाबोल केला.
इंदापूर येथील वीज वितरण कार्यालयाच्या समोर शनिवार (दि. २७) पासून सक्तीने वीज वसुली करणाऱ्या राज्य सरकार, व महावितरणच्या विरोधात इंदापूर भाजपच्या वतीने धरणे आंदोलनास सुरूवात करण्यात आली आहे. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांसमोर माजीमंत्री हर्षवर्धन पाटील बोलत होते. ते पुढे म्हणाले, तुम्ही तर राज्यमंत्री आहात आम्ही कॅबिनेट मंत्री होतो. तालुक्यामध्ये अशा पद्धतीचा कारभार आम्ही कधी केला नाही. सत्तेचा दुरुपयोग करून तालुक्यातील जनतेला वेठीस धरणार असाल तर हे योग्य घडत नाही. तुम्ही जर पहिल्याच दिवशी म्हणाला असता माझ्या तालुक्यातील शेतकऱ्यांची वीज तोडायची नाही. जर वीज तोडली तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन, अशी भूमिका तुम्ही घ्यायला हवी होती. यावेळी अप्पासाहेब जगदाळे, विलासराव वाघमोडे, शरद जामदार, शकिल सय्यद यांची भाषणे झाली. यावेळी लालासाहेब पवार उपस्थित होते.
मग आम्ही सुद्धा कारखान्याच्यावतीने सहकार्य करू....
महावितरणने आज शेतकऱ्यांची वीज जोडावी. महिनाभराच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांची वीज बिले दुरुस्त करून द्यावीत. आम्हालाही कळते पैसे भरावे लागतील. मात्र पैसे कुठले भरायचे? त्याची माफी आम्हाला किती मिळणार, त्यातील दंड व्याज तुम्ही किती कमी करणार, हे प्रत्येक शेतकऱ्याला समजलेच पाहिजे. मग आम्ही तुम्हाला हवे ते सहकार्य करायला तयार आहोत. सर्व वीज बिले कमी करा. वन टाइम सेटलमेंट करा. ५० टक्के माफी द्या, मग तुम्ही आम्हाला सांगा आम्ही तुम्हाला कारखान्यांमधून सुद्धा सहकार्य करू. यातून मार्ग काढायला आम्ही सुद्धा तयार आहोत. मात्र हुकूमशाही पद्धतीने तुम्ही विज तोडणार असाल हे खपवून घेतली जाणार नाही, असेही हर्षवर्धन पाटील यावेळी म्हणाले.