नोटाबंदीमुळे शेतमालाला आली मंदी
By admin | Published: January 12, 2017 01:50 AM2017-01-12T01:50:16+5:302017-01-12T01:50:16+5:30
नरेंद्र मोदींनी केली नोटाबंदी, आली शेतमालाला मंदी, हातची गेली संधी, शेतकरी झाला कर्जदाराचा बंदी.
टाकळी हाजी : नरेंद्र मोदींनी केली नोटाबंदी, आली शेतमालाला मंदी, हातची गेली संधी, शेतकरी झाला कर्जदाराचा बंदी... अशी परस्थिती ग्रामीण भाागतील झाली असून, शहरातील लोकांसाठी गृहकर्जाच्या दरात कपात केली. मात्र, आम्हाला शेतमाल फेकून देऊनही सरकारनं काय दिलंय? असा सवाल शेतकरीवर्गातून केला जात आहे.
नोटाबंदीला ६० दिवसांहून जास्त दिवस झालेत; मात्र अजूनही त्याचा परिणाम ग्रामीण भागात दिसून येत आहे. पंतप्रधान मोदींनी ५० दिवसांचे आवाहन केले होत. त्यानतंरही अजूनही ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवरील झालेल्या परिणामामध्ये कोणतीही सुधारणा झालेली नाही.
याबाबत बोलताना कवठे येमाई येथील तरुण शेतकरी दीपक पोकळे यांनी सांगितले, की तरुणाला शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नाही. आपल्या वडिलोपार्जित जमिनीमध्येच तो अत्याधुनिक पद्धतीने शेती करत आहे. त्यासाठी बँकेचे कर्ज घेतलेय. मात्र, सध्या डाळिंब असो की कांदे, टोमॅटो, बटाटा या कोणत्याच मालाला बाजारभाव नाही.
उत्पादन खर्चसुद्धा मिळत नाही. या देशात ७० टक्के अर्थव्यवस्था ग्रामीण भागातील शेतीवर अवलंबून आहे. मात्र, या सरकारने ६० दिवसांमध्ये बळीराजा व ग्रामीण भागातील जनतेचा विचार केला नाही, तर शहरातील लोकांना फक्त गृहकर्जाचे व्याजदर कमी केले. मग हे सरकार फक्त शहरातील लोकांसाठीच का? असा सवाल त्यांनी केला.
पीककर्जावरील ६० दिवसांचे व्याज माफ म्हणजे शेतकऱ्यांची क्रूर थट्टा असल्याने तरुणवर्ग शेतापासून दूर चालला असून, त्यामध्ये नैराश्याची भावना निर्माण झाली आहे. (वार्ताहर)