पुणे : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत केंद्र शासनाला पाठविल्या जाणाऱ्या स्मार्ट सिटी आराखड्याचे काम महापालिका प्रशासनाने सुरू केले आहे. हा आराखडा कशा प्रकारचा असेल, त्यासाठीचे निकष काय आहेत, कोणत्या प्रकल्पांचा त्यात समावेश असावा याबाबतची माहिती विभागप्रमुखांना देण्यासाठी मंगळवारी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीत आराखडा तयार करण्याचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती कुमार यांनी दिली. केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेतील राज्यातील १० शहरांमध्ये पुणे महापालिकेचा समावेश करण्यात आला आहे. त्यासाठी शहरांची निवड करताना, राज्याने पुणे आणि पिंपरी महापालिकांचा एकत्रित समावेश केला आहे. राज्य शासनाने निवड केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात महापालिकांनी तीन महिन्यांच्या आत स्मार्ट सिटी प्रपोजल (सीप) केंद्र शासनाला सादर करायचे आहे. या सीपवरूनच केंद्राकडून महापालिकेच्या प्रकल्पांना मान्यता दिली जाणार आहे. केंद्र शासनाला राज्याकडून पुणे आणि पिंपरी-चिंचवड ही दोन्ही शहरे एकत्रित पाठविल्याने ११ शहरे झाली असून, त्यांतील एक शहर केंद्राकडून वगळण्यात येणार आहे. ही शहरांची यादी केंद्राकडून येत्या १ स्पटेंबर रोजी जाहीर केली जाणार आहे. मात्र, त्याची वाट न पाहता, महापालिकेकडून हा आराखडा जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे तयार करण्यासाठी आधीच तयार करण्यास सुरुवात झाली असून, त्यासाठी आवश्यक असलेल्या घटकांची माहिती सादरीकरणाद्वारे विभागप्रमुखांना देण्यात आल्याचे कुमार म्हणाले.(प्रतिनिधी)
स्मार्ट सिटी आराखड्याचे काम सुरू
By admin | Published: August 26, 2015 4:36 AM