स्मार्ट सिटीचे डिस्प्ले बेकायदा : महापालिकेने बजावली नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 07:20 PM2018-06-28T19:20:16+5:302018-06-28T19:23:00+5:30
पुणे शहरात काम करणाऱ्या स्मार्ट सिटी कंपनीने बेकायदेशीर व्हेरिएबल मेसेज डिस्प्ले लावल्याने पुणे महापालिकेने त्यांना नोटीस पाठवल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे स्मार्ट सिटी कंपनी आणि महापालिकेत नवा संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे.
पुणे : पुणे शहरात काम करणाऱ्या स्मार्ट सिटी कंपनीने बेकायदेशीर व्हेरिएबल मेसेज डिस्प्ले लावल्याने पुणे महापालिकेने त्यांना नोटीस पाठवल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे स्मार्ट सिटी कंपनी आणि महापालिकेत नवा संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे.
शहरात महापालिकेच्या व्यतिरिक्त स्मार्ट सिटी कंपनीमार्फत काही प्रकल्प राबवले जातात. त्यामुळे शहराच्या विकासाचे काम महापालिकेसोबत स्मार्ट प्रकल्पाच्या माध्यमातूनही होत असते. मात्र याच कंपनीने शहरात माहिती देणारे डिजिटल डिस्प्ले बसवले होते. या डिस्प्लेवर स्मार्ट सिटी विषयी विविध प्रकारची माहितीही देण्यात येत आहे. मात्र हे डिस्प्ले बसवण्यापूर्वी महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाची परवानगी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे स्मार्ट सिटीचे डिस्प्ले वादात सापडला आहे.
संपूर्ण शहरात सुमारे १६१ ठिकाणी हे डिस्प्ले बसवण्यात आले असून याविरोधात २४ ऑगस्ट २०१७रोजी स्मार्ट सिटीला नोटीस पाठवण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा याच विषयावर नोटीस पाठवण्यात आली. याबाबत सर्वसाधारण सभेत काँग्रेसचे सदस्य अविनाश बागवे यांनी प्रश्न उपस्थित केला.शहरात लावण्यात येणाऱ्या इतर फलकांवर महापालिका कारवाई करत असताना स्मार्ट सिटीच्या बेकायदेशीर फलकांना मान्यता का देण्यात आली असा सवाल सभासदांनी उपस्थित केला आहे.याच विषयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने सभागृहाबाहेर आंदोलन करण्यात आले.