सत्ताधा-यांकडूनच स्मार्ट सिटीचे वाभाडे, पालकमंत्र्यांचीही टीका,अधिका-यांवर कारवाईचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 03:23 AM2017-10-19T03:23:53+5:302017-10-19T03:24:10+5:30
स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीने मोठ्या दिमाखात विविध कामांचे उद््घाटन ठेवले खरे, मात्र त्याच कार्यक्रमात पालकमंत्री गिरीश बापट स्थानिक आमदारांनीही केंद्र सरकारच्या या योजनेत प्रशासन नीट काम करीत नाही
पुणे: स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीने मोठ्या दिमाखात विविध कामांचे उद््घाटन ठेवले खरे, मात्र त्याच कार्यक्रमात पालकमंत्री गिरीश बापट स्थानिक आमदारांनीही केंद्र सरकारच्या या योजनेत प्रशासन नीट काम करीत नाही, अशी टीका करीत त्यांचे वाभाडे काढले. कामाला भरपूर वाव आहे, पण कामे होत नाहीत. त्याला गती द्या, अन्यथा अधिकाºयांच्या खिशातून नागरिकांचे पैसे वसूल करावे लागतील.
कंपनीने निवडलेल्या औंध-बाणेर-बालेवाडीमधील औंध येथील स्मार्ट सिटीमधील मॉडेल रस्ता म्हणून दीड किलोमीटरचा रस्ता तसेच प्लेस मेकिंग या योजनेचे उद््घाटन पालकमंत्री बापट यांच्या हस्ते बुधवारी सकाळी औंध येथे झाले. महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, आमदार मेधा कुलकर्णी, विजय काळे, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप या वेळी उपस्थित होते.
आमदार काळे यांनी बोलताना सुरुवातीलाच प्रशासनाविषयीच्या नाराजीचा सूर लावला. ते म्हणाले, या योजनेत लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले जात नाही, ही अत्यंत चुकीची बाब आहे. त्यामुळे आता योजनांमध्ये त्रुटी निघू लागल्या आहेत. काम कोणासाठी करायचे आहे, कसे करायचे आहे याचा काहीही विचार होताना दिसत नाही. लोकप्रतिनिधी उपयुक्त सूचना करू शकतात, मात्र त्यांना कसली माहितीच दिली जात नाही.
काळे यांचे बरोबर आहे, असे स्पष्ट करून बापट म्हणाले. पुणेकरांच्या स्मार्ट सिटीबद्दल अनेक अपेक्षा आहेत. त्या त्यांनी वेळोवेळी व्यक्तही केल्या आहेत, मात्र प्रत्यक्षात दाखवावे, असे काहीही होताना दिसत नाही. शहराच्या जुन्या हद्दीचा विकास आराखडा तयार झाला. मेट्रो योजना मागून आली तरीही तिचे काम सुरूसुद्धा झाले. स्मार्ट सिटीमधील कामे मात्र दिसत नाहीत, असे चालणार नाही. उशीर करणाºयांना जबाबदार धरून नागरिकांचा पैसा त्यांच्याकडून वसूल केला जाईल, असे बापट म्हणाले.
जबरदस्तीने कामे लादू नका
स्मार्ट सिटीमधील कामे नागरिकांवर लादू नका, त्यांचा विचार घ्या, त्यांना काय हवे ते महत्त्वाचे आहे. नको असलेली कामे जबरदस्तीने लादली गेली तर ती कोणीही स्वीकारणार नाही, असे बापट यांनी अधिकाºयांना बजावले. लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्याबाबतही त्यांनी सूचना केली.