...म्हणून त्याचे नाव दोषारोपपत्रात समाविष्ट केले नाही; डॉ नरेंद्र दाभोलकर खून प्रकरण
By नम्रता फडणीस | Published: August 21, 2023 08:02 PM2023-08-21T20:02:45+5:302023-08-21T20:03:12+5:30
सीबीआयचे तत्त्कालीन तपासी अधिकारी एस. आर. सिंग यांची न्यायालयात माहिती
पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खून प्रकरणातील सहआरोपी अमोल काळे याने पुरविलेले शस्त्र आणि मोटारसायकल याचा शोध घेतला का? त्याचे कुणाशी कनेक्शन होते याची चौकशी केली का? त्याची मानसशास्त्रीय मूल्यमापन चाचणी केली का? ब्रेन मँपिंग साठी अर्ज केला होता का? अशा प्रश्नांची सरबत्ती बचाव पक्षाच्या वतीने सीबीआयचे तत्कालीन तपासी अधिकारी एस. आर. सिंग यांच्यावर सोमवारी उलटतपासणी दरम्यान करण्यात आली. त्यावर ‘नाही’ असे सांगत सिंग यांनी काळेविरूद्ध कोणताही पुरावा न मिळाल्याने त्याचे नाव दोषारोपपत्रात समाविष्ट केले नसल्याची माहिती न्यायालयाला दिली.
चार महिन्यांनी डॉ. दाभोलकर यांच्या खटल्याच्या सुनावणीला पुन्हा सुरुवात झाली. या प्रकरणात डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, अँड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच जणांवर आरोप निश्चिती करण्यात आली आहे. डॉ. दाभोलकर यांची 20 आॅगस्ट 2013 रोजी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणातील, सीबीआयचे तत्कालीन तपासी अधिकारी एस. आर. सिंग यांची विशेष न्यायाधीश पी.पी जाधव यांच्या न्यायालयात बचाव पक्षाच्या वतीने सोमवारी उलटतपासणी घेण्यात आली. सीबीआयने अमोल काळे, अमित डिगवेकर आणि राजेश बंगेरा यांना संशयित आरोपी म्हणून अटक केली होती. त्याचाच धागा पकडत बचाव पक्षाचे अँड प्रकाश साळशिंगीकर यांनी अमोल काळे याच्याविषयी सिंग यांना विचारले की काळे याने शस्त्र आणि मोटारसायकल पुरविली होती याची माहिती मिळाली होती का? त्यावर ‘हो’ असे उत्तर सिंग यांनी दिले. मग त्या गोष्टी शोधण्याचा प्रयत्न केला का? त्यावरह सिंग यांनी नकारार्थी उत्तर दिले. त्याचे कुणाशी कनेक्शन होते याबाबत चौकशी केली का? याचे आर्थिक स्त्रोत काय होते हे तपासण्याचा प्रयत्न केला का? अमोल आणि इतर आरोपीचे मोबावर संवाद झाला का हे जाणून घेण्यासाठी मोबाइल कंपन्यांना पत्र पाठविले होते का? असे एकामागोमाग एक प्रश्न अँड साळशिंगीकर यांनी विचारले पण त्यांनी ’नाही’असेच सांगितले. इतर आरोपींप्रमाणे त्याचीही मानसशास्त्रीय मूल्यमापन चाचणी केली होती का? असे विचारले असता तो चाचणी करण्यास तयार नव्हता. तो कोणतेही सहकार्य करीत नव्हता असे सिंग यांनी न्यायालयाला सांगितले. मग ब्रेन मँपिंगसाठी अर्ज केला होता का? असे विचारले असता ‘नाही’ असे सिंग म्हणाले. शेवटी अमोल काळे विरूद्ध कोणताही पुरावा नसल्याने त्याचे नाव दोषारोपत्रात समाविष्ट केले नाही अशी माहिती सिंग यांनी न्यायालयाला दिली. दरम्यान, उद्याही (दि.22) एस. आर. सिंग यांची उलटतपासणी होणार आहे.