...तर मी ५ नगरसेवक निवडून आणू शकतो; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसंत मोरेंची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 02:38 PM2022-05-10T14:38:32+5:302022-05-10T14:39:07+5:30
मी एकला चलो रे असलो तरी पक्षातच आहे
पुणे : औरंगाबादच्या सभेनंतर राज ठाकरे यांनी जोपर्यंत भोंगे उतरवले जात नाहीत. तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात महाआरती, मशिदीसमोर हनुमान चालीसा लावणे, अशी आंदोलने कार्यकर्त्यांनी सुरु ठेवली आहेत. तसेच काही भागात त्यांच्याकडून पोलिसांना निवेदनही दिले जात आहे. या सर्व घडामोडींमध्ये राज ठाकरेंचे कट्टर समर्थक आणि पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे आंदोलनांत सहभागी नसल्याने विविध चर्चाना उधाण आले होते.
त्यावेळी मी पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी बालाजी दर्शनाला गेलो होतो. अक्षय्य तृतीयेनिमित्ताने हे नियोजन केले होते. त्यामुळे मला आंदोलनात सहभागी होता आले नाही. परंतु माझ्या अनुपस्थितीमध्ये सुद्धा महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर होते. एखादा सैनिक नसेल तर लढाई हरत नाहीत. त्यामुळे जर माझ्या नसल्याने विविध चर्चा होत असतील. तरी मी अजूनही राजमार्गावरच आहे आणि राजमार्गावरच राहणार मतभेद असले तरी मनभेद नाहीत तेव्हा वसंत मोरे यांनी स्पष्ट केले होते.
आज सकाळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे पोलिसांची भेट घेतली. यावेळी वसंत मोरे आणि मनसेचे शिष्टमंडळ वेगळे असल्याचे दिसून आले. याबाबत मोरे यांना विचारले असता त्यानी एकला चलो रे असलो तरी पक्षातच आहे असे सांगितले आहे. तसेच माझ्याकडे शहराची जबाबदारी नसली तरी माझ्याकडे तीन प्रभागांची जबाबदारी दिली. तर त्यातून मी ५ नगरसेवक निवडून आणू शकतो. अशी तयारी वसंत मोरे यांनी दाखवली आहे.
मोरे म्हणाले, राज ठाकरे विचारांचा अथांग महासागर आहे, त्याला अनेक नद्या नाले मिळतात. सगळे खळखळणारे आहेत. त्यापैकी मी एक खळखळणारा आहे. माझी वाट नेहमी वेगळीच असते. माझं ध्येय धोरण असत, पक्ष वाढवणे, जास्तीत जास्त जाग निवडून आणणे हे आहे. तीन प्रभागांमधून ९ नगरसेवकांपैकी ५ नगरसेवक मनसेचे असतील अशी तयारी त्यांनी दाखवली आहे. शहराची जबाबदारी अध्यक्षांची आहे. त्याबद्दल मी काही बोलू शकत नाही. माझं २५ नगरसेवकांचे टार्गेट होते. माझ्या भागातील नगरसेवक कसे वाढतील याकडे लक्ष देतोय. माझा मार्ग राजमार्ग आहे.