Maratha Reservation: ...तर मुख्यमंत्र्यांचा आदर करून वेळ दिला पाहिजे : पृथ्वीराज चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 09:36 AM2023-11-20T09:36:23+5:302023-11-20T09:38:51+5:30
छत्रपती संभाजीराजेंनी मंत्री छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे...
बारामती (पुणे) : सरकारने आरक्षणाचा प्रश्न सोडवला पाहिजे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ पूर्वी धनगर समाजाला कशाच्या आधारावर आश्वासन दिले होते. याचे स्पष्टीकरण केले पाहिजे. इतर आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी वेळ मागितला आहे. इतर आरक्षणाप्रश्नी त्यांनी शपथपूर्व आश्वासन दिले असेल तर त्याचा आदर करून वेळ दिला पाहिजे, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. बारामती येथे आयोजित कार्यक्रमासाठी चव्हाण उपस्थित होते.
यावेळी चव्हाण पुढे म्हणाले, एकीकडे मराठा आरक्षण तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणावरून समाजात तीव्र भावना आहेत. याबाबत मी भाष्य करणार नाही. मात्र, आपल्या राज्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडता कामा नये. जे कोणी राजकीय पुढारी सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचा प्रयत्न करत असेल तर ते निंदनीय आहे. आपण खेळीमेळीने गुण्यागोविंदाने राहिले पाहिजे. हे प्रश्न कायदेशीर मार्गाने सोडवले पाहिजे. मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले होते. मात्र, सरकार गेल्यामुळे ते टिकवता आले नाही. माझी खात्री आहे की, आमचं सरकार असतं तर आरक्षण टिकवलं असतं. मात्र, सरकारला अधिकार नसताना देवेंद्र फडणवीस यांनी कायदा करून महाराष्ट्राच्या डोळ्यात धूळ फेकली की काय, हा प्रश्न आहे. आज मुख्यमंत्र्यांनी शपथ घेऊन कोणत्या आधारावर आश्वासन दिलेलं आहे. सामाजिक स्वास्थ्य कायम राहून हा प्रश्न कसा सोडवणार आहोत. यासाठी वेळ दिला पाहिजे, असेही चव्हाण म्हणाले.
छत्रपती संभाजीराजेंनी मंत्री छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर बोलताना चव्हाण म्हणाले की, माझं स्पष्ट मत आहे, समाजात तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य होता कामा नये. हा प्रश्न रस्त्यावर सुटणारा नाही. रस्त्यावर सोडवण्याचा कोणी प्रयत्न करत असल्यास ते महाराष्ट्राच्या दृष्टीने दुर्दैवी आहे. कायदेशीर मार्गाने हा प्रश्न सोडविला पाहिजे. आरक्षणावरून दोन समाजाला खेळवण्याचा कार्यक्रम केला जात असल्याचे चव्हाण म्हणाले. पाच राज्यांच्या निवडणुकीबाबत बोलताना चव्हाण म्हणाले की, मला खात्री आहे की बहुतेक राज्यांमध्ये काँग्रेस सत्तेत येईल.