मुंबई - विधानसभेची निवडणूक ही महाराष्ट्राच्या भविष्याची निवडणूक आहे. शेतकऱ्याचं भविष्य, तरुणाचं भविष्य, माताभगिनींची सुरक्षा कोणाच्या हातात द्यायची हे ठरविणारी ही निवडणूक आहे. केंद्रीयमंत्र्यांच्या सभेला लोकं येत नाहीत, पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या सभेला लोकं गर्दी करतात. पवारसाहेबांवरील आणि दत्ता भरणेंवरील प्रेम असल्यानेच ही गर्दी जमा होतेय. महाराष्ट्रातील सत्तापरिवर्तनाची ही नांदी आहे, असे डॉ. अमोल कोल्हेंनी म्हटले.
इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे उमेदवार दत्तात्रय भरणे यांच्या प्रचारासाठी अमोल कोल्हेंची सभा घेण्यात आली. या सभेत बोलताना, अमोल कोल्हेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर टीका केली. कितीही झालं तर कमळ हे चार पेपरातच गुंडाळलं जात, असे कोल्हेंनी म्हटले. राखणदार नेमायचा असेल तर दुसऱ्याच्या घरात चोरी केलेल्याला आपण नेमतो का?. मग, मेगा भरतीचं महापोर्टल करण्याचं काम त्या कंपनीला देण्यात आलं. ज्या कंपनीचं काम मध्य प्रदेशमधील व्यापम घोटाळ्यात ब्लॅकलीस्ट झालं होतं. म्हणजे मेगा भरती होणारचं नव्हती? काय झालं मेगा भरतीचं? असा प्रश्न उपस्थित करुन अमोल कोल्हेंनी भाजपा सरकारवर टीका केली.
तसेच 19 वर्षे मंत्रीपद मिळाल्यानंतरही एखाद्या माणसाला कमळाचा आधार घ्यावा लागत असेल, तर 19 वर्षे काय केलं? असा प्रश्न कोल्हे यांनी हर्षवर्धन पाटील यांचं नाव न घेता विचारला. त्यानंतर, स्थानिक मुद्द्यांनाही कोल्हेंनी हात घातला.