—उपमुख्यमंत्री अजित पवार
अजित पवारांनी उलगडले पहाटेच्या कामाचे गुपित
बारामती: ‘पवारसाहेबां’मुळे आम्हा बारामतीकरांना सकाळी लवकर उठून काम करण्याची सवय लागली. मध्यरात्री दीड ते दोन वाजेपर्यंत काम करीत सकाळी ७ वाजता काम सुरू करण्याची त्यांची सवय आहे. इतक्या लवकर काम सुरू करण्याचा त्यांचा आदर्श घेतल्याने लवकर उठण्याची सवय लागली. वेळेत काम केल्याने मिळालेल्या संधीचे सोने करणे शक्य होते. तत्परतेने उठून काम केल्यास कामे देखील मार्गी लागतात, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटे लवकर उठून कामाला सुरुवात करण्यामागील गुपित उलगडले.
बारामती येथे सकाळी पावणेसात वाजता एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम वेळेवर सुरू देखील झाला. या कार्यक्रमासाठी सकाळी दि मुस्लिम को-ऑप बँकेचे चेअरमन डॉ. पी. ए. इनामदार देखील पुणे शहरातून पोहोचले. यावेळी कार्यक्रमात बोलताना पवार यांनी सकाळी पोहचलेल्या इनामदार यांचे स्वागत करीत सकाळी लवकर काम सुरू करण्यामागे असणारे गुपित उलगडले.
उपमुख्यमंत्री पवार यांचा भल्या पहाटे उठून काम सुरू करण्याचा स्वभाव आहे. अनेकदा त्यांच्या या स्वभावामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांसह कार्यकर्त्यांची तारांबळ उडते. याबाबतची भूमिका मांडताना या वेळी पवार म्हणाले, आम्हाला बारामतीकरांना भल्या पहाटे काम सुरू करायची सवय लागलीय. पवारसाहेबांमुळे ही सवय लागलीय. आता अनेकजण त्यामुळं थोडं दबकतात की हा बाबा कधी येईल याची शाश्वती नाही. मुद्दाम कुणाला तरी त्रास द्यायचा अशी भूमिका नसते. लवकर काम सुरू केलं की इतर कामांनाही वेळ देता येतो. काहींना या सवयीचा त्रास होतो. मात्र, कोणाला याचा त्रास व्हावा, अशी आमची भावना कधीही नसल्याचे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.
राज्याचे उत्पन्न सव्वातीन लाख कोटींवर घसरले
राज्याचे दर वर्षी असणारे साडेचार लाख कोटींचे उत्पन्न कोरोनासंकटात सव्वातीन लाख कोटींवर घसरले आहे. विविध करांचे उत्पन्न घटल्याने हे उत्पन्न घटले. राज्य शासनाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन आणि निवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्तिवेतनावर दीड लाख कोटी रुपये शासन खर्च करते, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.