लक्ष्मण मोरे/प्रतिनिधीपुणे : सध्याच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या जगण्यामुळे अल्पवयातच नैराश्य घेरु लागले आहे. नोकरीच्या, रोजगाराच्या, व्यवसायाच्या, कौटुंबिक समस्या असोत किंवा वैयक्तिक स्वरुपाच्या समस्या असोत; त्यांच्याशी दोन हात करण्यापेक्षा आपले जीवन संपवणे अधिक सोपे वाटू लागले आहे. नैराश्याच्या गर्तेमध्ये सापडलेल्यांशी वेळीच संवाद साधला गेला आणि त्यांना त्यामधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न झाले तर अनेकांचे जगणे पुन्हा सुंदरतेकडे वळू शकेल. नेमका हाच विचार घेऊन सध्या ‘नेटकरी’ मंडळींनी फेसबुकद्वारे आश्वासक आधार द्यायला सुरुवात सुरुवात केली आहे. आत्महत्या प्रतिबंध जागरूकता, तुम्ही एकाकी नाही, तुमच्या बद्दल मला आस्था आहे. अशा ‘हॅश टॅग’ सह फेसबुकवरुन नैराश्यग्रस्तांना प्रेमाचा हात देण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आलेला आहे. सोशल मीडियाद्वारे चांगला असो अथवा वाईट असो कोणताही संदेश काही क्षणांतच सर्वदूर पोचवणे सोपे झाले आहे. जगभरामध्ये आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मानसिक आरोग्य जागरुकता सप्ताह पाळला जातो. अमेरीकेच्या संसदेने ठराव करुन १९९० साली या सप्ताहाला सुरुवात केली. अमेरिकेतील ‘नॅशनल अलायन्स आॅन मेंटल इलनेस’ या संस्थेने मानसिक रुग्णांबाबत समाज शिक्षण आणि बदलासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी हा कार्यक्रम सुरु करण्याचा प्रस्ताव दिलेला होता. भारतामध्येही विविध राज्यांमध्ये हा सप्ताह पाळला जातो. अलिकडच्या काळात मानसिक आजार उद्भवण्याचे प्रमाण वाढले आहे. यासोबतच नैराश्य येण्याच्या प्रमाणातही कमालीची वाढ होत चालली आहे. मानसिक औदासिन्य वाढण्यास आसपासची परिस्थिती कारणीभूत ठरत असली तरी एकमेकांमधला संवाद, समजूतदारपणा, सहनशीलता आणि संवेदनशीलता कमी होत चालली आहे. वर्ल्ड हेल्थ आॅर्गनायझेशनच्या अभ्यासानुसार, २०२० साली औदासीन्यचा दबाव पूर्ण जगात दुसर्या क्रमांकावर असेल. विकसित आणि विकसनशील देशांच्या उपचाराक्षमतेपेक्षाही रुग्णांची संख्या अधिक होण्याची भिती डब्ल्यूएचओने व्यक्त केलेली आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा फार जवळचा संबंध आहे. मानसिक औदासिन्यामुळे ह्रदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह आदी आजार उद्भवू शकतात. बेरोजगारी, विस्कळीत कुटुंब, गरिबी, अंमली पदार्थांचे सेवन, मानसिक विकृती यामधून नैराश्य येऊ लागले आहे. समाजामध्ये वावरत असताना अनेकदा सर्वसामान्यांप्रमाणेच या व्यक्ती वागत असतात. अचानक एखाद्या दिवशी कोणीतरी फेसबुकच्या वॉलवर मेसेज लिहून आत्महत्या करतो, तर कोणाकडून पती, पत्नी, नातेवाईकांना व्हॉट्सअॅपकरुन आत्महत्या केली जाते. काहीजणांनी फेसबुकवर लाईव्ह आत्महत्या केल्याचीही उदाहरणे आहेत. योग्य आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, सुरक्षित लैंगिक संबंध, मद्य आणि तंबाखूचे सेवन न करणे, नियमित औषधोपचार यामुळे हे आजार प्रयत्नपूर्वक दूर करता येऊ शकतात. सर्वात महत्वाचे म्हणजे संवादाच्या अभावामधून या घटना वाढत चालल्या आहेत. खरोखरीच जर अशा नैराश्याने घेरलेल्या व्यक्तींशी संवाद साधला गेला, त्यांना प्रेमाचा आणि आपुलकीचा स्पर्श झाला तर कदाचित त्यांचे जीवन संपविण्यापासून वाचविण्यात यश येऊ शकेल. हल्ली व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियावरुन एकमेकांना मेसेज पाठविणे, इमोजी अथा चॅटिंगद्वारे संवाद साधला जातो. मात्र, हा संवाद खरा संवाद नव्हे. त्यामुळे प्रत्यक्ष एकमेकांना भेटणे, बोलणे, हलके होणे हेच अधिक महत्वाचे आहे. त्याचे महत्व ओळखून फेसबुकवर ‘माझ्या घराचे दार उघडे आहे’ ही मोहीम राबविण्यात येत असून त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
काय आहे मेसेज?‘माझ्या घराचे दार उघडे आहे. घर सुरक्षित आहे. काही क्षणात तुम्हाला चहा/कॉफी मिळेल. स्वयंपाकघराच्या ओट्याचे कोणतेही पूर्वग्रह नाहीत, तिथे शांती नांदते. ज्याला कोणाला बोलायचंय त्याच्याशी गप्पा मारायला मी सदैव तयार आहे. एकेकटे सोसत बसू नका. घरात अन्न, चहापाणी आहे, तुमचं ऐकून घ्यायला उत्सूक कान आहेत. रडायला खांदा आहे. तुमचं माझ्या घरात स्वागत आहे. तंत्रज्ञानाच्या युगात या काही जुन्या गोष्टी आपण विसरत आहोत. फक्त एखादा एसेमेस, इमोजी किंवा व्हिडीओ चॅट आपल्या जिवलगांना वेळ देण्यासाठी, काळजी घेण्यासाठी पुरेसा नाही! किमान एक मित्र/मैत्रिण हे कॉपी करून स्वत:च्या वॉलवर रिपोस्ट करेल का? कृपया नुसते शेअर करू नका. जगात तुम्ही कधीही खरोखर एकाकी नाही हा संदेश पोचायला हवा.’मराठी मालिकांमध्ये काम केलेल्या अभिनेता सुयश टिळकनेही हा मेसेज स्वत:च्या फेसबुक वॉलवर पोस्ट केला आहे. हा मेसेज पोस्ट करुन आपल्यातील संवेदनशील माणसाचे दर्शन त्याने घडविले आहे.फेसबुकवर मानसिक आरोग्य जागरुकता सप्ताहानिमित्त हा मेसेज आमच्या वाचनात आला. अलिकडच्या काळात महिलांमध्ये नैराश्याचे प्रमाण खुप वेगाने वाढत आहे. महिलांसाठी आम्ही सुरु केलेल्या ‘मैत्र’ व्यासपीठावरुन याबाबत सतत संवाद साधला जात आहे. मैत्रच्या फेसबुक पेजसह सर्व सभासद महिलांनी स्वत:च्या पेजवर हा मेसेज कॉपी पेस्ट केला आहे. तसे आवाहन आम्ही केले होते. त्याला प्रतिसाद मिळत असून संवादामधून अनेकांना आपण मानसिक, भावनिक आधार देऊ शकू असे वाटते. - मेधा पुरकर, संचालिका, मैत्र