डॉ. बाबा आढाव : साथी पन्नालाल सुराणा लघुपटाचे स्क्रिनिंग
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “लोकशाही, समाजवादाची ध्वजा खांद्यावर घेऊन आम्ही आजही काम करीत आहोत. संविधानाला अभिप्रेत भारत निर्माण करणे, समाजवादी शीलाचे नागरिक निर्माण करणे हे आमचे स्वप्न आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी व्यक्त केला.
संवाद पुणे व आरोग्य सेना यांच्या वतीने लोकनेते भाई वैद्य यांच्या तृतीय स्मृतिदिनाचे औचित्य साधून भाई वैद्य यांचे स्नेही, सहकारी पन्नालाल सुराणा यांच्या जीवनकार्यावर आधारित साथी पन्नालाल सुराणा लघुपटाचे स्क्रिनिंग झाले. त्या वेळी डॉ. आढाव बोलत होते. अविचल सत्याग्रही निष्ठेतून पन्नालाल सुराणा यांनी सर्वसामान्य व्यक्तीला न्याय देण्याचा प्रयत्न केला, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले. अध्यक्षस्थानी आरोग्य सेनेचे डॉ. अभिजित वैद्य होते. संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, लघुपटाचे दिग्दर्शक धनंजय भावलेकर व्यासपीठावर होते.
लघुपटाचे लोकार्पण आणि डिव्हिडीचे प्रकाशन डॉ. आढाव आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. बाबा आढाव यांच्यावरील लघुपटाची निर्मिती आरोग्य सेना आणि संवाद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने लवकरच केली जाणार असून त्याचे लोकार्पण पन्नालाल सुराणा यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची घोषणा या वेळी करण्यात आली.
पन्नालाल सुराणा म्हणाले, “बार्शीसारख्या छोट्या शहरात जन्म आणि शिक्षण झाले. पुण्यातही काही काळ वास्तव्य केले. सेवा दलामुळे चळवळीत भाग घेतला. पत्नीची उत्तम साथ मिळाली. मला जेवढे शक्य आहे तेवढे मी केले. विशेषत: ग्रामीण भागात जाऊन भक्कमपणे पाय रोवून माझ्या हातून काही कार्य घडल्याचे समाधान आहे.”
सुनील महाजन यांनी प्रास्ताविक केले. धनंजय भावलेकर यांनी मनोगत व्यक्त केले. ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष यांचा शुभेच्छा संदेश ऐकविण्यात आला. सावनी विनिता यांनी सूत्रसंचालन केले. मराठी चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे यांनी आभार मानले.