प्रा. मिलिंद जोशी : साहित्य परिषदेत ''स्पंदन'' या बहुभाषिक त्रैमासिकाचे प्रकाशन
पुणे : जात, धर्म, भाषा आणि प्रांत यांच्या आधारे समाजाचे विघटन करणाऱ्या शक्तींचा प्रभाव वाढत आहे. अशा परिस्थितीत भाषाभगिनींमध्ये साहित्याच्या माध्यमातून स्नेहाची स्पंदने निर्माण झाली, तर समाज एकसंध राहील, असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले.
''स्पंदन'' या बहुभाषिक त्रैमासिकाच्या अंकाच्या प्रकाशनप्रसंगी जोशी बोलत होते. परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, ''स्पंदन'' बहुभाषिक त्रैमासिकाचे संपादक इंतेखाब फराश, कार्यवाह दीपक करंदीकर, प्रमोद आडकर, मंजूर देशमुख, सिकंदर पठाण, शगुफ्ता दंडोती, बशीर काजी, प्रा. डाॅ. शाकिर शेख, अबुल कलाम खान, सलीम शेख, अ. कय्युम दंडोती यावेळी उपस्थित होते.
प्रा. जोशी म्हणाले, '' मराठी साहित्याचे दालन समृध्द करण्यात मुस्लिम लेखकांचे योगदान मोठे आहे. तरीही त्यांना साहित्य व्यवहारात पुरेसे प्रतिनिधित्व मिळत नाही, ही मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळ आणि ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था यांची खंत आहे. ती दूर करण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद पुढाकार घेईल. यापूर्वी उर्दू साहित्य परिषदेसमवेत महाराष्ट्र साहित्य परिषदेने संमेलनाचे आयोजन केले होते. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सहकारी शिक्षिका असलेल्या फातिमाबी शेख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ग्रामीण मुस्लिम साहित्य संस्था आणि साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने स्मृती व्याख्यान आयोजित करण्यात येईल.''
दीपक करंदीकर यांनी सूत्रसंचालन केले. इंतेखाब फराश यांनी आभार मानले.