बालेवाडी येथे वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून सॉफ्टवेअर इंजिनिअरची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 07:31 PM2019-04-12T19:31:55+5:302019-04-12T19:33:32+5:30
सॉफ्टवेअर इंजिनिअरने वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून बालेवाडी येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली़..
पुणे : हिंजवडीतील कॉग्निझंट कंपनीतील सॉफ्टवेअर इंजिनिअरने वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून बालेवाडी येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली़. चेतन वसंतराव जायले (वय २६, रा़. बालाजी हौसिंग सोसायटी) असे त्याचे नाव आहे़. ही घटना १० एप्रिल रोजी सकाळी घडली़. याप्रकरणी त्याचा भाऊ कुंदन जायले (वय २९, रा़ ठाकुर्ली, मुंबई) यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. त्यानुसार पोलिसांनी रवी अचला आणि हेमंत खडके यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे़.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चेतन जायले हा मुळचा अकोला येथील होता. तो कॉग्निझंट टेक्नॉलॉजी सोल्युशन्स कंपनीमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून मागील साडेचार वर्षांपासून काम करीत आहे़. मागील सहा महिन्यांपासून त्यांची टीम बदलली़. त्यामध्ये रवी आचला हे इंग्लंडमधून टीमचे काम पाहत होते़ तर हेमंत खडके हे पुण्यातून काम पाहायचे़. चेतन हा बालेवाडी फाटा येथील बालाजी हौसिंग सोसायटीत इतर मित्रांबरोबर रा़हत होता़. चेतन हा १० एप्रिलला घरीच होता़. सकाळी त्याने सुसाईड नोट लिहून गळफास घेऊन आत्महत्या केली़. सायंकाळी त्याचे मित्र आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला़.
चेतन याने आपल्या सुसाईड नोटमध्ये रवी अचला आणि हेमंत खडके यांनी दिलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे़. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक डी़ एस़ शिंदे अधिक तपास करत आहेत़.