मुलगा, मुलगी आणि आई यांची पोलिसांनाच धक्काबुक्की! तिघांची थेट केली तुरुंगात रवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 09:09 PM2021-06-10T21:09:21+5:302021-06-10T21:09:27+5:30
अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता तिघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे
धायरी: कोरोना विषाणू संसर्गाच्या दृष्टीने पुणे शहरासह उपनगरात पोलीस अधिकारी व कर्मचारी नेमून दिलेल्या हद्दीत नाकाबंदी करत कर्तव्य बजावत आहेत. मात्र जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला व कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याने एका तरुणासह दोन महिलांवर सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रितेश माणिक जगधने ( वय: २८ वर्षे, सोमनाथ नगर, वडगांव शेरी,) छाया माणिक जगधने (वय : ६१ वर्षे) व सुषमा राजेश दोषीलकर (वय: ३४ वर्षे) असे मुलगा, मुलगी व आई यांना याप्रकरणी अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता तिघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत पोलिस उपनिरीक्षक विलास धोत्रे यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात या तिघांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे पोलीस सोमवारी धायरी येथील उंबऱ्या गणपती चौकात नाकाबंदी करत होते. दरम्यान सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास एका चारचाकी वाहनातून आसन क्षमतेपेक्षा जास्त असे ७ जण विनामास्क प्रवास करताना आढळून आल्याने त्यांना नियमानुसार पावती करण्यास सांगितले.
त्यावेळी पोलिसांच्या हातातील पावती पुस्तक हिसकावून घेऊन ' मी पावती करणार नाही, तुला काय करायचे ते कर असे म्हणून सोबतच्या व्यक्तींना आपले कार्यकर्ते बोलावून घे, ह्यांना हिसका दाखवतो हिथं तमाशाच करतो, रस्ता रोको करतो, लय झाली ह्यांची नाटकं असे म्हणत मोठमोठ्याने आरडाओरडा केला. लोकांची गर्दी जमवून पोलिसांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. तसेच हवालदाराला लाथ मारून शासकीय कामात अडथळा आणल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सिंहगड रस्ता पोलिसांनी तिघांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.